मुंबई : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरानजीक घडलेल्या रेल्वे दुर्घटनेतील (Train Accident, Pachora) मृतांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथूनच त्यांनी दुर्घटनेबद्दल माहिती घेतली आहे. तसेच, दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्थापने करीत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले..
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत एक विडिओ संदेश जारी केला असून, ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणासुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.