Tuesday, September 17, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडक्या बहिणींना दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत, तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढत जाऊन टप्प्याटप्प्याने 3 हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री भावनिक होत म्हणाले, माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे. लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करुया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया, असे आवाहन केले.

अन्य लेख

संबंधित लेख