Wednesday, August 13, 2025

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

Share

नांदेड : नांदेड (Nanded) शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले (ShivendraRaje Bhonsle) यांनी दिले. शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे (Dr Ajeet Gopchade) उपस्थित होते.

https://twitter.com/InfoNanded/status/1951264780448071838

शहरातील रस्त्यांची कामे करताना नागरिकांना त्रास होता कामा नये, याची दक्षता घेवून मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकमेकात समन्वय ठेवून कामे तात्काळ पूर्ण करण्यावर भर द्यावा तसेच जिल्ह्यात वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, असे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले.

काही तालुक्यातील रस्ते खूपच खराब झाले आहेत. वर्दळ, देवस्थान अशा ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देवून ती कामे वेळेत पूर्ण करा. जिल्ह्यातील जे रस्ते दरवर्षी दुरुस्ती करावी लागतात अशा रस्त्यांना दुरुस्त करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, पोलीस वसाहतीच्या इमारतीचे दुरुस्ती व इतर कामे पूर्ण करावेत. किनवट-हदगाव रस्त्यांची कामे, नांदेड शहरातील चौकांचे सुशोभिकरण, शिवाजीनगर भागातील ड्रेनेजची कामे, टोल नाक्यावरील बोगस पावत्या इत्यादी महत्त्वाचे विषय लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत त्यांनी संबंधिताना सूचना दिल्या.

शासनाच्या 100 दिवसांच्या मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगले काम केले असून आता 150 दिवसांच्या मोहिमेत विभाग अव्वल राहील यांची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांनी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामांची माहिती व विभागातील मनुष्यबळ, पदभरती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

अन्य लेख

संबंधित लेख