मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यावर ओढवलेले दु:ख पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना कोणताही सोहळा न करण्याचे आवाहन केले आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट जसेच्या तसे:
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी मी वाढदिवस साजरा करणार नाही. या दिवशी कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे.
अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात मी आणि संपूर्ण शिवसेना सहभागी आहे.”