Tuesday, September 17, 2024

आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिशन हिंदुत्व लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून शिवसेनेचा धनुष्य आणि बाण हाती घेवून अनेकांना घायाळ केले. त्यातच कालांतराने उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोडून महायुतीला जबरदस्त जोड दिली.

या पार्श्वभूमीवर २०२४ ची हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. टेंभी नाका मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना धर्मवीर २ चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी टेंभी नाक्याला दहिहंडीची परंपरा सुरु केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. टेंभी नाक्यावर पाहायला मिळत असलेला हा जोश दिघे साहेबांनी तयार केलेला आहे. हा जोश कसा तयार झाला हे अनुभवायचं असल्यास लवकरच धर्मवीर २ चित्रपट येतोय. तो सर्वांनी पाहावा,” असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, “अडीच वर्षांपूर्वी मी आणि शिंदे साहेबांनी एक पापाची हंडी फोडली आणि त्यातून महाराष्ट्रात एक पुण्याची हंडी उभारली. त्यामुळे काळजी करू नका. २०२४ मधली हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत. हंडी कुणीही फोडली तरी काला सगळ्यांचाच असतो. समाजाने एकत्रितपणे हा काला खायचा आहे आणि एकत्र राहायचं आहे. प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला प्रेमाचा संदेश पुढे नेण्यासाठी आपण थरावर थर लावून हंडी फोडणारच,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात दिली. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते.

आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचला असून “प्रो-कबड्डी” प्रमाणे हा “प्रो-गोविंदा” खेळ झाला. शासनाने या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली आहे. त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊन सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख