मुंबई : “महामानव आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी हार्दिक अभिवादन करतो. आज देशभरातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे जमले आहेत, त्यांना माझ्या वतीने आदरपूर्वक ‘जय भीम’” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. चैत्यभूमीवर 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
“बाबासाहेबांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेबांचं संविधान आजही आपल्यासोबत आहे” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
“आपण इथे माणुसकी धर्म पाळण्यासाठी जमलो आहोत. काल आझाद मैदानात ऐतिहासिक शपथविधी पार पडला. देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची, आम्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. खरं म्हणजे ती संविधानाची शपथ होती. त्या समारंभात बाबासाहेब उपस्थित होते. आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेब कायमच आपल्यासोबत आहेत. चंद्र, सूर्य आणि सत्य यांच्यासोबत, चौथी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचं संविधान, जे आपल्यासोबत सदैव राहील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
“मी नेहमीच म्हणतो, ‘जब तक सूरज, चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान बना रहेगा’. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत. चैत्यभूमीवर माथा टेकवणे म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनमूल्यांचा जागर करणे होय,” असे ते म्हणाले.
“माझ्या जीवनाची कथा अशा प्रकारे सांगता येईल की, एक सामान्य कार्यकर्ता होतो, समाजकारण करत करत राजकारणात कसं आलो हे समजलेच नाही. कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी उपमुख्यमंत्री. एका सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता या पदावर पोहोचू शकला, ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच. सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकतो आणि आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकतात, हे सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झालं,” असे एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांच्या संविधानाचे महत्त्व सांगितले.
“मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली, आम्ही राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक संघ बनून काम करू. संविधानाचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झाला. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात संविधान मंदिर बांधण्याची घोषणा आम्ही केली आहे आणि त्याचे काम सुरू आहे. या ज्ञानाच्या महासागरापुढे मी नतमस्तक होतो,” असे एकनाथ शिंदे यांनी समारोप केला.
याप्रसंगी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, राहुल शेवाळे, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, अमर साबळे, अमोल मिटकरी, राजकुमार बडोले, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.