छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. तसेच आनंद दिघेंची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे.
“शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात येत होत्या. एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा द्या, असं पोलिसांनी स्वत: सांगितलं होतं. पण त्या फाईलवर सही केली गेली नाही. कारण त्यांना एकनाथ शिंदेंना शहीद करायचं होतं. परंतू, एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते. म्हणून या सगळ्यातून ते स्वत: उभे राहिलेत,” असं ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “आनंद दिघे यांची हत्या झाली होती. ठाण्यातील सर्वांना याची माहिती आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. अशावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. आनंद दिघे यांची वाढती ताकद काहींना खटकत होती. शिवसेनेत आनंद दिघे यांना मोठ्या पदावर आणून बसवले तर गोची होईल, हे ज्या नेत्यांच्या लक्षात आले होते, त्यांनीच आनंद दिघे यांचा काटा काढला असावा. आपल्यापेक्षा कोणीही मोठे होता कामा नये, ही रणनीती आखणारे लोक त्या पक्षात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.