Monday, March 16, 2026

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल

Share

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती (जि. पुणे) आणि राहुरी (जि. अहिल्यानगर) या दोन महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत असून, संबंधित जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीचे मुख्य वेळापत्रक

अधिसूचना जारी होणे: ३० मार्च २०२६

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: ६ एप्रिल २०२६

अर्जांची छाननी: ७ एप्रिल २०२६

अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ एप्रिल २०२६

मतदान: २३ एप्रिल २०२६ (गुरुवार)

मतमोजणी व निकाल: ४ मे २०२६ (सोमवार)

ओळखपत्रासाठी विविध पर्याय

मतदानासाठी ‘मतदार फोटो ओळखपत्र’ (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. मात्र, ते उपलब्ध नसल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या १२ पर्यायी कागदपत्रांच्या आधारे मतदारांना आपला हक्क बजावता येईल. सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT यंत्रांचा वापर केला जाणार आहे.

बारामतीचे आमदार अजित अनंतराव पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी संवाद साधताना म्हटले, “मला असं वाटतं की बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात. एकमताने सर्वांनी मिळून हा निर्णय करावा असा अम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लागली गेली तर ती निवडणूक लढवण्यास आम्ही तयार आहोत.”

अन्य लेख

संबंधित लेख