परदेशी घुसखोर आणि दहशतवाद्यांचा अड्डा ठरलेल्या पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी भागातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बुलडोझर चालवत कठोर कारवाई केली होती. त्याच धर्तीवर, अहमदाबाद महानगरपालिकेने चांदोल तलाव परिसरातील अवैध अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत व्यापक साफसफाई मोहीम राबवली आहे. ही मोहीम केवळ शहरी नियोजनाचा भाग नसून, हा गुन्हेगारी, बेकायदा कारवाया आणि देशविघातक शक्तींच्या मोठ्या तळावर चालवलेला हातोडा आहे.
चांदोल तलाव परिसर ही अहमदाबाद शहरातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची जलसाठा व्यवस्था आहे. यामध्ये मोटा चांदोल नावाने ओळखला जाणारा पश्चिमेकडील मोठा चांदोल तलाव आणि नाना चांदोल नावाचे पूर्वेच्या बाजूचे दोन छोटे तलाव आहेत. वस्तुतः प्राचीन हिंदू संस्कृतीमध्ये जलस्रोतांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये या तलाव परिसरावर अवैध अतिक्रमण, झोपडपट्ट्यांचे वाढते जाळे व प्रादेशिक घुसखोरीमुळे या ऐतिहासिक स्थळाचे रूपांतर एका अपवित्र व असुरक्षित भागात झाले होते.
पोलिसांच्या नोंदीनुसार चांदोल तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या बेकायदा झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. कोणतीही वैध कागदपत्रे नसूनही या घुसखोरांनी जागा बळकावून तिला गुन्हेगारीचे आगार बनवले होते. या वर्षी, पोलिसांनी शहरातून ताब्यात घेतलेल्या २५० बेकायदेशीर घुसखोरांपैकी २०७ जण चांदोल परिसरातील होते. ही परिस्थिती लक्षात घेता या भागात व्यापक अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता होती.
अहमदाबाद महानगरपालिकेने जलस्रोतांचे संरक्षण आणि स्थानिक भूमीपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची व्यापक मोहीम दोन टप्प्यात पार पाजली. या मोहिमेचा पहिला टप्पा २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत पार पडला. त्यात ४,००० हुन जास्त अतिक्रमणे जमीदोस्त करून १.५ लाख चौरस मीटर जागा मोकळी करण्यात आली. त्यानंतर २० मे ते २३ मे या काळात सुमारे ८,५०० अतिक्रमणे पाडून २.५ लाख चौरस मीटर जागा रिकामी करण्यात आली.
या परिसरात वाढलेला परदेशी घुसखोर, गुन्हेगार आणि जिहादी कट्टरवाद्यांचा प्रभाव विचारात घेऊन या अतिक्रमण विरोधी मोहिमेला संरक्षण देण्यासाठी ३,००० पोलीस कर्मचारी आणि गुजरातच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
या मोहिमेचे विश्लेषण करताना, काही छुपे राजकीय आणि देशविघातक, विशेषतः पाकिस्तानशी निगडित, हितसंबंधांमुळे उत्पन्न होणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अनेक तज्ञ, अभ्यासक, राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक आणि विचारवंतांनी अवैध स्थलांतर आणि अंतर्गत सुरक्षा या संदर्भातील प्रश्नांवर प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या संदर्भात या कारवाईचे महत्त्व अधोरेखित होते.
चांदोल तलावाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ
चांदोल तलाव हा अहमदाबादच्या प्राचीन इतिहासाचे प्रतीक आहे. आशा भिल्ल यांनी ‘अशावल’ (आजचे अहमदाबाद) शहराची स्थापना केली, तेव्हापासून या तलावाचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. मुस्लिम सरदार ताज खान नारी अली याच्या पत्नीने या तलावाचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख असला तरी, त्याचे मूळ प्राचीनत्व आणि नैसर्गिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक इतिहास आणि आदिवासी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी अशा ठिकाणांचे मूळ सांस्कृतिक महत्त्व अनेक ठिकाणी अधोरेखित केले आहे. या तलावाने महात्मा गांधींच्या मीठाच्या सत्याग्रहासारखे ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत.
भारतीय संस्कृतीत जलस्रोतांना अत्यंत महत्व आहे. नद्या, तलाव हे जीवनदायी असून त्यांच्याभोवती एक अध्यात्मिक वलय असते. पर्यावरण आणि धर्मशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनी भारतीय परंपरेतील जलस्रोतांच्या पावित्र्याबाबतच्या आणि निसर्ग-संरक्षणाच्या मूल्यांवर विस्तृत लेखन केले आहे. अशा या ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळावर झालेले अनधिकृत अतिक्रमण हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, आपल्या हिंदू संस्कृतीचा अपमान आहे.

अतिक्रमणाचे संकट: सभ्यता आणि सुरक्षेला आव्हान
चांदोल तलावाच्या परिसरात झालेली योजनाबद्ध अतिक्रमणे चिंताजनक होती. केवळ तात्पुरत्या झोपड्याच नव्हे, तर पक्की घरे, गोदामे आणि व्यावसायिक गाळेही याठिकाणी उभारण्यात आले होते. या अतिक्रमणांमध्ये मोठ्या संख्येने “बांगलादेशी घुसखोर” वास्तव्यास होते.
गुजरातचे गृहराज्यमंत्री श्री. हर्ष संघवी सांगतात की, चांदोल तलाव परिसरातून पूर्वी अल-कायदाशी संलग्न दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तेथे अमली पदार्थांचे मोठे अड्डे कार्यरत होते. त्याशिवाय बांगलादेशी घुसखोरांकडून वेश्याव्यवसायाचे जाळे चालवले जात होते. हे सर्व अड्डे या अतिक्रमण विरोधी कारवाईत नष्ट करण्यात आले.
घुसखोरांचा उपयोग भारताविरुद्ध अस्थिरता निर्माण करण्यासाठी, लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी ‘स्लीपर सेल’ म्हणून करण्याची पाकिस्तानची कार्यपद्धती अनेकदा उघड झाली आहे. त्यामुळे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चांदोल तलाव परिसरातील बेकायदा झोपडपट्ट्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि घुसखोरीच्या माध्यमातून भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सातत्याने होत असताना, त्याकडे काणाडोळा करणे म्हणजे आपल्या अस्तित्वालाच आव्हान देण्यासारखे आहे.
राजकीय इच्छाशक्ती आणि निर्णायक कारवाई
अहमदाबाद महानगरपालिका आणि गुजरात सरकारने दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती आणि अतिक्रमणाच्या विरोधात केलेली ही निर्णायक कारवाई निश्चितच प्रशंसनीय आहे. देशविघातक आणि समाजविघातक घटकांना कायद्याचा धाक दाखवण्यासाठी हजारो पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्यांच्या संरक्षणात केलेली ही कारवाई अत्यंत गरजेची होती. ही कारवाई थांबवण्यासाठी काही हितसंबंधित शक्तींनी गुजरात उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. परंतु, उच्च न्यायालयानेही कारवाईला स्थगिती देण्यास नकार देत, जलसाठ्याच्या जागेवरील बांधकाम बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
या कारवाईमुळे अतिक्रमित जागा मोकळी करण्यातच यश आलेले नाही, तर कायद्याचे राज्य स्थापित करण्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देण्याचा उद्देश्य तिच्यामुळे स्पष्ट दृष्टिगत होतो. काही तथाकथित मानवाधिकार कार्यकर्ते, पुरोगामी आणि विशिष्ट राजकीय पक्ष या कारवाईला जातीय रंग देण्याचा किंवा गरीबांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत असले तरी, वस्तुस्थिती ही आहे की, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण सर्वाधिक महत्वाचे आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम
हिंदू परंपरेत निसर्गाला आणि विशेषतः जलस्रोतांना देवत्व बहाल केले आहे. तलाव, नद्या या जीवनदायिनी आहेत आणि त्यांचे पावित्र्य राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे. चांदोल तलाव परिसरातील अतिक्रमणे हटवल्यामुळे आता त्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग मोकळा होईल.
सेक्रेड वॉटर्स: पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम हिंदुइझम” (Sacred Waters: Perspectives from Hinduism) यासारखे पर्यावरण आणि हिंदू धर्मातील संकल्पनांवर आधारित अनेक ग्रंथ आणि शोधनिबंध जलस्रोतांच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकतात. या अतिक्रमणांमुळे तलावाच्या पर्यावरणाचा ऱ्हास होत होता आणि त्याचे पाणी दूषित होत होते. ही कारवाई त्या प्रदूषणाला आळा घालण्यास देखील मदत करेल.
भूमिपुत्रांचे हक्क आणि सांस्कृतिक अस्मिता:
आशा भिल्ल यांनी स्थापित केलेल्या अशावलचा वारसा सांगणाऱ्या या भूमीवर घुसखोरांनी केलेले अतिक्रमण हे स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांवर आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेवर झालेले आक्रमण होते. ही भूमी मूळ हिंदू समाजाची आणि येथील स्थानिक जनजातीय बांधवांची आहे. जनजातींच्या इतिहासाचे अवलोकन जनजातींच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी पारंपरिक भूभागाच्या संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट दर्शवते.
चांदोल तलावाच्या अतिक्रमण निर्मूलनाची ही मोहीम एक सुरुवात आहे, भविष्यात पुन्हा अशी अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आणि सीमाभिंत बांधण्याचा निर्णय योग्यच आहे.
चांदोल तलाव अतिक्रमण मोहिम ही एक स्थानिक प्रशासकीय कारवाई बरोबरच यामागे हिंदू समाजाच्या मूल्यांचे रक्षण, जलस्रोतांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न, भूमिपुत्रांच्या हक्कांची पुनर्स्थापना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला असलेले संभाव्य धोके दूर करण्याचा एक दृढ संकल्प आहे.