परिवर्तन ही काळाची गरज. काळासोबत बदलत जाणे अनिवार्यच म्हणावे लागेल. परिवर्तन म्हणजे बदल. काळ कधीही, कुणासाठीही न थांबणारा. काळाप्रमाणे प्रत्येकाने आपल्यात योग्य तो बदल घडवून आणला तर काळाच्या ओघात चालल्याने जीव सुखमय होणारं.
युग म्हणजे एक दीर्घ कालखंड म्हणजे एक विशेष काळ जो इतिहास संस्कृती किंवा समाजाच्या विकासाच्या संदर्भात ओळखला जातो. युग हे एक मोठे तत्व आहे जे कालगणनेत भिन्न कक्षांमध्ये विभागले जाते. उदा. प्राचीन युग ,मध्य युग, आधुनिक युग.
युगांचे विभाजन अनेक वेळा ऐतिहासिक घटना – उदा. शिवाजी महाराजांचा काळ, तंत्रज्ञानातील बदल – उदा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सामाजिक परिवर्तन – उदा. समाजात स्त्री पुरुषांचे बदलणारे आयाम. या प्रगतीच्या आधारे केले जातात.
प्रत्येक युगाची आपआपली वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात.
उदा. प्राचीन युग – हा मानवाच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यामध्ये सभ्यतेचा प्रारंभिक आरंभ झाला आणि मानवाचा इतिहास घडला.
मध्ययुग- हा काळ सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक बदलांनी भरलेला होता. तर आधुनिक युग म्हणजे १८ व्या शतकापासून सुरू झालेला काळ .जो विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगीकरण आणि सामाजिक बदलांनी समृद्ध झालेला आहे. आधुनिक युगाने मानव जातीसाठी अनेक नवीन संधी आणि आव्हाने आणली. यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले. प्रत्येक युगाची आपापली वैशिष्ट्ये असतात. आपल्या -आपल्या घटना, विचारधारा, संस्कृती असतात. त्या काळातील लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणा-या- उदा. सत्ययुगात रामराजाने सर्व कळत असूनही सीतेचा त्याग केला फक्त एका परिटाच्या वक्तव्यावरून कारण ते सत्ययुग होते.
भूतकाळातील ज्ञान आणि वर्तमानाची जाणीव करून देण्यासाठी युगांचा अभ्यास मानवाच्या विकासाच्या संदर्भात एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल.
‘जुनं ते सोनं’ हे जरी खरं असलं तरी काळाप्रमाणे बदलणं हेही तितकेच गरजेचे आहे. काळ पुढे पुढे जातच राहणार आहे. त्यात नवनवीन बाबींचा, गोष्टींचा अंतर्भाव होतच राहणार आहे. पण “आमच्या वेळी नव्हतं बाई असं. हे युग जरा जास्तच घाईचं , धावपळीच झालंय” असेही वक्तव्य समाजातून बऱ्याच वेळा ऐकायला मिळतात हे जरी खरे असले तरी तुमच्या वेळी असणार आणि आताच असणार यातला सुवर्णमध्य साधण आवश्यक. तो साधला गेला तर मग आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण व्हावयास कितीसा वेळ लागणार बरं. यासाठी मागच्या पिढीला दोन पावलं पुढे सरकणे आणि नवीन पिढीला दोन पावलं मागे सरकण महत्त्वाच आहे. जून तेच कवटाळून बसले तर हे परिवर्तन अशक्य. उदा. जुन्या काळी चुलीवर भांड्यांमध्ये वरण-भात शिजवून स्वयंपाक केला जायचा. आता गॅस, इलेक्ट्रिक शेगडी, कुकर वगैरे आले. पण जुन्या स्त्रियांनी आत्ताच्या स्त्रियांना म्हणावं तुही तसा स्वयंपाक कर जसा आम्ही करत आलो तर ते शक्य होणारं नाही. आजच्या स्त्रीला आपल्या दहा भुजा फैलावून काम करायचे आहे .मग त्या जर अशा स्वयंपाक करायला लागल्या तर आधुनिकतेचा उपयोगही होणार नाही व एका कामाव्यतिरिक्त त्या दुसरही काही करू शकणार नाही. यासाठी जुन्या स्त्रियांनी थोडसं बदलून नविनतेची कास धरली व नव्या पिढीने थोडं त्यांच्या मनाप्रमाणे वागलं तर दोन पिढ्यांमध्ये दरी निर्माण होणार नाही व सुवर्णमध्य साधणं सोपं होईल. हे झालं स्वयंपाकाच्या बाबतीत पण असं जीवनाच्या सर्वच अंगांनी सर्वच बाबींना विचारात घेऊन करता येण्यासारखं आहे. आजच्या युगात सामाजिक दृष्टिकोनातूनही फार मोठे बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रियांना माजघरातून बैठक खोलीत येण्याची मुभा किंवा परवानगी नव्हती. पण आज स्त्रियांद्वारे जीवनातील कोणतेच क्षेत्र काबीज करावयाचे राहिलेले नाही.
संस्कृतीचा विचार केला तर आज आपण म्हणतो जुनी संस्कृती लोप पावत आहे. जुनं आजकाल कोणाला आवडत नाही. पण विविध संस्कृतींच्या एकत्रीकरणातून नवनवीन विचारधारा या परिवर्तनातून उदयाला येत आहेत.
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाने आजच्या, आताच्या या जगात फार मोठी प्रगती साधलेली आहे. या प्रगतीच्या आधारावर आज जगाची संपूर्ण अर्थव्यवस्था बसू बघते आहे. पण एखाद्याने याच्याशी जुळवून घेतलेच नाही तर काळाच्या ओघात तो इतका मागे पडेल की काळ एक दिवस त्याला संपवून टाकेल याची जाणीव त्याला कदाचित असणारही नाही. यासाठी प्रत्येकाने नव्याची कास धरून परिवर्तन स्वीकारायला पाहिजे. इंटरनेट, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे. हा बदल प्रत्येकाने स्वीकारून त्यासोबत काम करणे गरजेचे आहे. कोरोना काळात याचा अनुभव अगदी लहान मुलांपासून तर सगळ्या मोठ्यांपर्यंत, कामकरी जनतेपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत आणि जगातील सर्वात उच्चतम असणाऱ्या संस्थांपासून तर लोकांपर्यंत सर्वांनीच घेतलेला आहे. त्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा स्वीकार केला नसता तर कदाचित सर्व व्यवहार ठप्प होऊन अर्थव्यवस्था संपूर्ण ढासळली असती. जीवनावश्यक वस्तूंचा ही उपलब्धता कदाचित राहिली नसती आणि कोरोनाने नाही तर जीवनावश्यक वस्तूंच्या अभावी अनेक लोकांना मृत्युमुखी पडावे लागले असते.
या तंत्रज्ञानाच्या विकासाने मनुष्याच्या जगण्याचे संपूर्ण आयामच बदलून गेलेले आहेत. जगण्याचे संदर्भ कदाचित बदलले गेले पण ती बाब जीवनासाठी अत्यावश्यक ठरते आहे.
संस्कृती बदलली तरी संस्कार कायम असावे, तंत्रज्ञान स्वीकारले तरी मूळ कायम असावे, कितीही बदल झाले तरीही जुन्याला धरून चाललेले असे असले तर कितीही परिवर्तनाचा युग आले तरी कोणालाच, कसलीच अडचण निर्माण होणार नाही. प्रत्येक जण या बदलाला आनंदाने स्वीकारून उत्तम जीवन जगू शकेल.
जुन्या पानांचा गंध, नवीनांना गुंजतो। काळाच्या काठावर,
भविष्याचे स्वप्न गुंफतो। परिवर्तनाच्या धारेत, जीवन चालवतो।
सत्य एकच आहे, काळ सदैव बदलतो।।