Saturday, July 27, 2024

पहिलं AI महाबालनाट्य… आज्जीबाई जोरात

Share

सध्या लहान मुले सुद्धा इतर समाजमाध्यमांत अडकून गेलेली आहेत. नवनवीन जे जे मालिकारूपात (कार्टूनस्) येणारे पाहायला मिळते. अलीकडच्या काळात ‘अलबत्या गलबत्या’, ‘बोक्या सातबंडे’सारखी नाटकंही पुन्हा येऊ लागली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळतोय. असेच हकले फुलके आणि आधुनिक तंत्रज्ञानासहित, आजच्या मुलांची मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांना पुन्हा एकदा मातृभाषेच्या संस्कारांपर्यंत घेऊन जाणारे क्षितीज पटवर्धन यांचे लेखन आणि दिग्दर्शित असणारे ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. नाटकात आज्जीबाईच्या भूमिकेत निर्मिती सावंत, तर पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर आणि अभिनय बेर्डे हे प्रमुख भूमिकेत आहेत.

आज तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुलांना त्यांच्या कलाकलाने पुन्हा: एकदा आजूबाजूच्या जगाकडे, पुस्तकं, वाचनसंस्कार, त्यातून त्यांचा होणारा व्यक्तिमत्त्व विकास यांकडे वळवणं ही खरोखरचं कठीण गोष्ट झालीये. कोणतीही गोष्ट हाताच्या बोटांवर मिळण्याची सवय लागलेली आहे. सध्याच्या पिढीला मनोरंजनाचा वेगळा विचार करण्यासाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे, हे समाजवणं महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या मुलांना खेळायला हवी असणारी मैदाने पाहिजे आहेत, ती तितकी उरलेली नाहीत; खरंतर पूर्वीसारखी आजी-आजोबांसहची एकत्र कुटुंबं सुद्धा राहत नाहीयेत असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुलांच्या त्यांच्याबरोबरच्या गप्पागोष्टी आणि वेळ देणं हे सगळंच संपलं आहे. घरातील लहान मुलाला मोबाइल घेऊन दिला की त्याचा तो आपोआपच रमतो असा पालकांनी आपला ग्रह करून घेतलेला आहे. त्यामुळेच कुठेतरी पालकांना मुलांसाठी गप्पा मारायला, समजून घ्यायलाही वेळ नाहीये. पालक देखील सोशल मीडिया आणि आपल्या रोजच्या व्यवधानांत व्यग्र झाले आहेत.

यासर्व स्थितीत ‘आज्जीबाई जोरात’ ह्या बालनाट्याच्या रूपात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. एकीकडे आजच्या पिढीचं तंत्रज्ञान वापरून मुलांना त्यात खिळवून ठेवायचं आणि त्यांच्या कलाकलानं घेत त्यांच्यावर भाषेचे संस्कार करायचे, त्याचवेळी त्यांचं निखळ मनोरंजन सुद्धा करायचं असा तिन्ही बाजूने विचार लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं कोरं AI महाबालनाट्यात रंगवला आहे.

जिगीषा-अष्टविनायक संस्था निर्मित असलेले हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. तर दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी सांभाळली आहे.

मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत, त्यांना परी, राक्षस, निसर्ग, खेळ, नाच-गाणी, जादूचे खेळ यांच्याशी त्यांची ओळख करून देणं ह्या नाटकावेळी संपूर्ण टीमने जबाबरादीने पेलले आहे. हे नाटक आजच्या पिढीशी कनेक्ट होणारे आहे, आणि त्यातले धोके सुद्धा त्यांना कळून येतील अशा स्वरूपाने मांडणी करण्यात आली आहे. या नाटकात दृक्-श्राव्य माध्यमाचाही (अॅनिमेशन) वापर करून ही गोष्ट कथा रंगवली गेली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख