महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे.
आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी
उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे. “प्रत्येक निवडणुकीत—मग विधानसभा असो की लोकसभा—हा अशी मुद्द्याची ‘किक’ मारतो, की थेट स्वतःच्याच संघाच्या गोलपोस्टवर गोल करतो. १०० सामने गेल्या १२ वर्षात हरला आहे. नाम तो सुना होगा… राहुल गांधी!!”
सायकल किक मारून पडलेले: उद्धव ठाकरे
दुसऱ्या खेळाडूच्या माध्यमातून उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “या खेळाडूने सायकल किक मारली. पण त्यावेळी जो पडला, तो अजून उठला नाही. वर्षानुवर्षे वडिलांचा/पक्षाचा वारसा म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यालाच बॉल समजत एकदम यु टर्न घेत याने सायकल किक मारायचा प्रयत्न केला. बॉल पण गेला, विचार गेला, वारसाही गेला… आता न खेळताच काठांवर बसून मॅच जिंकण्याच्या वल्गना करीत असतो.” (या टीकेचा संदर्भ २०१९ मधील महाविकास आघाडी निर्मिती आणि हिंदुत्वाच्या भूमिकेतील बदलाशी आहे.)
गोंधळलेले ‘मिड फिल्डर’: शरद पवार
तिसऱ्या ‘मिड फिल्डर’ खेळाडूच्या भूमिकेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “तिसरे प्लेअर ‘मिड फिल्डर’ आहेत. स्वतःला ‘पावर बाज’ समजतात. ते फक्त मैदानात राहण्याचा प्रयत्न करतात. मिड फिल्डरचं काम असतं, गोलसाठी संधी निर्माण करणे. पण सध्या आपण कोणत्या बाजूने खेळत आहोत हे त्यांनाच कळत नाहीये. तसं यांनी पेनल्टी मारत पीएमपोस्टवर गोल करायचा खूप प्रयत्न केला पण किक तशी बसलीच नाही.” (या टीकेचा रोख पवारांच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेतील संदिग्धता आणि पंतप्रधानपदाच्या प्रयत्नांकडे आहे.)
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींना ‘सेल्फगोल स्पेशालिस्ट’, उद्धव ठाकरेंना ‘सायकल किक मारून पडलेले खेळाडू’ आणि शरद पवारांना ‘गोंधळलेले मिडफिल्डर’ म्हणत उपाध्ये यांनी एकाच फटक्यात तीन प्रमुख विरोधी नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या उपरोधिक ‘खेळ’ामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली असून, सोशल मीडियावरही या ‘फुटबॉल’वरील टीकेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.