Wednesday, March 25, 2026

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

Share

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि समस्त हिंदू बांधवांच्या वतीने गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी शहरातून प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

व्याख्यानातून रामचरित्राचा जागर
उत्सवाचे औचित्य साधून २३ आणि २४ मार्च रोजी शहरातील सुमारे २० विद्यालयांमध्ये पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते विजय खुटवड (श्री संत सेवा संघ, पुणे) यांचे ‘पुरुषोत्तम श्रीराम’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत प्रभू श्रीरामांचे आदर्श पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२६ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वाजता गोदावरी काठावरून मिरवणुकीला प्रारंभ होईल. या मिरवणुकीत खालील आकर्षणे असणार आहेत.

पुण्याचे ढोल पथक : ढोल-ताशांच्या गजराने शहर दुमदुमणार.

सजीव देखावे : राम-लक्ष्मण आणि सीता माता यांचा नयनरम्य सजीव देखावा.

वानरसेना : भव्य ८ फुटी बजरंगबली आणि वानरसेनेचे पथक.

पारंपारिक कला : संबळ वादक आणि वारकरी भजनी मंडळांचा सहभाग.

मिरवणुकीचा मार्ग
गोदाकाठ येथून सुरू होणारी ही मिरवणूक भगवती चौक, श्रीराम चौक आणि अहिल्याबाई होळकर चौक मार्गे मार्गस्थ होईल. शिवस्मारक येथे प्रभू श्रीरामांचे पूजन करून मिरवणुकीचा समारोप होईल. त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

“गंगाखेड परिसरातील समस्त माता, भगिनी, युवक आणि व्यापारी बांधवांनी या भक्तीमय सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती, गंगाखेड तर्फे करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण गंगाखेड नगरीत सध्या उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख