नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संत ज्ञानी हरनाम सिंगजी यांनी भारतीय संस्कृती आणि धर्माच्या रक्षणासाठी महाराष्ट्र आणि पंजाबने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “ज्या देशाने सर्व विचारप्रवाहांचा, विविधतेचा, धर्म, जात, पंथांचा सन्मान केला, त्या आपल्या भारतावर मुघलांनी आक्रमण केले, प्रचंड अत्याचार केले. हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांना धर्मरक्षणासाठी जे बलिदान द्यावे लागले, त्या शौर्याचे अभिवादन करताना मुघलांच्या क्रौर्याला कदापि विसरता येणार नाही,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, आपल्या धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धन, प्रलोभन व जबरदस्ती करून आपले अनुयायी निर्माण करणे, हे कोणत्याही धर्मात नाही. धर्मात बळजबरीला थारा नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतीय संस्कृती, येथील धर्मावर मुघलांनी जे आक्रमण केले, ते महाराष्ट्र आणि पंजाबने परतावून लावल्याने आजचा भारत आपण पहात आहोत, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्राची भूमी ही वीरांची आहे, संतांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या शौर्यालाही अभिवादन केले.
शीख समाजात अरदासची परंपरा आहे. अरदासच्या माध्यमातून भक्ती करणारे अनेक पंथ आहेत. यात बंजारा, शिकलकरी, सिंधी, लबाना, मोहयाल ही सारी एक आहेत. या समाजांना एकसंघ करून त्यांना न्याय देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे गौरवोद्गार आपल्या मनोगतात काढले. कार्यक्रमाच्या प्रारंभी, सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांना व सर्व गुरुंना वंदन केले. यावेळी विविध मान्यवर संत उपस्थित होते.