Saturday, March 21, 2026

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Share

अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विदर्भातील अकोला आणि नागपूर शहरात संपन्न होत आहे.

अकोला: २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, प्रमिलाताई ओक सभागृह.

नागपूर: २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता, सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर.

या कार्यक्रमात तब्बल ६० कलाकार आपल्या कलेतून गुरु तेग बहादुर साहेबजींचे जीवनकार्य उलगडणार आहेत. यामध्ये पंजाबी भक्ती गीते, ऊर्जापूर्ण भांगडा नृत्य आणि प्रभावी नाट्यमय प्रसंगांचा समावेश आहे. ‘हिंद-दी-चादर’ म्हणजे हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल; गुरुजींनी दिलेला सहिष्णुता आणि बंधुतेचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यात एकूण आठ ठिकाणी या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी, मिरा रोड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील यशस्वी प्रयोगांनंतर आता हा सोहळा अकोला आणि नागपुरात होत असून, त्यानंतर नाशिक व पिंपरी चिंचवड येथेही त्याचे सादरीकरण केले जाईल. समाजात एकता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख