Sunday, July 14, 2024

हिंदू समाजातील विजयी चैतन्याचा दिवस: शिवराज्याभिषेक दिन

Share

शिवराज्याभिषेक या युगप्रवर्तक पराक्रमाचे काही पैलू आवर्जून सांगितले पाहिजेत. शिवराज्याभिषेक हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा यशस्वी पराक्रम होता. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव.

शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव मृगेंद्रता याची आठवण करून देण्यासाठी आजपासून ३५० वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी घडवलेला कार्यक्रम म्हणजे शिवराज्याभिषेक. विजयाचा जल्लोष करण्याची सवय मोडलेल्या हिंदू समाजात विजयी चैतन्य जागवण्यासाठी घडवून आणलेले चैतन्य जागरण म्हणजे शिवराज्याभिषेक.

वडिलोपार्जित गादीवर वडिलांच्या नंतर वारसाहक्काने बसण्याचा एक तांत्रिक उपक्रम म्हणून राज्याभिषेक नव्हता. हिंदू सरदार असतील, फार तर मांडलिक असतील पण स्वघोषित राजा असू शकेल? शक्यच नाही, असे उत्तर खोटे ठरवून दाखवण्यासाठी केलेला त्या सहस्त्रकातील सर्वात रोमांचकारी पराक्रम म्हणून या शिवराज्याभिषेकाचा आठव करावयाचा आहे. म्हणून एका अर्थाने हा हिंदू साम्राज्य उत्सव आहे.

म्हणून हा संपूर्ण भारत वर्षाने साजरा करण्याचा दिवस व ३५० वे वर्ष. यात फक्त गडकोट किल्ले किती जिंकले याचा हिशोब नाही तर हिशोब ठेवायचा आहे शिवाजी महाराजांच्या उद्दिष्टांचा. जी उद्दिष्टे या शिवराज्याभिषेकात व्यक्त होतात. म्हणून शिवाजी महाराजांच्या कोणत्याही रणांगणातील पराक्रमापेक्षा राज्याभिषेक हा श्रेष्ठ पराक्रम आहे.

यात सप्त सिंधूंचे स्मरण आहे, काशी विश्वनाथ मंदिर मुक्तीचे स्वप्न आहे, धर्मपरावर्तनाच्या प्रक्रिया सुरू करायच्या होत्या, फक्त महाराष्ट्र ही सीमा नव्हती तर संपूर्ण देश हे स्वप्नं होते, संस्कृतीचे पुनरुज्जीवन हे उद्दिष्ट होते, हे सर्व जगासमोर मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे शिवराज्याभिषेक होय. म्हणून शिवशाहीतील सुवर्ण क्षण म्हणून हा दिवस साजरा करू या.

या युग प्रवर्तक पराक्रमाचे काही पैलू आवर्जून सांगितले पाहिजेत. शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा पराक्रमच होता. मी उभे करीत असलेले हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे हा विश्वास भारतभर पसरलेल्या हिंदू समाजाला व आग्र्याहून राजगडापर्यंत सर्व गावोगावच्या हिंदू लोकांनी आमचा राजा म्हणून जे सहकार्य शिवाजी महाराजांना केले, त्या नात्याचा उच्चरवात केलेला हुंकार म्हणजे शिवराज्याभिषेक. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव.

सन १६६६ साली शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करून घेतली व १६६९ साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदीराला भ्रष्ट केले. त्यानंतरची शिवाजी महाराजांची कृती आम्हाला सांगते की शिवाजी महाराज संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करत होते न की फक्त महाराष्ट्र वा मराठी माणसांचा. मी आपला सेवकच आहे म्हणत त्यांनी तक्रार काय केली तर जिझिया कर रद्द करा. हिंदुंवरील अन्याया विरूद्ध तक्रार केली आहे. डोळ्यासमोर संपूर्ण हिंदू समाज आहे. म्हणून शिवराज्याभिषेक हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे व राष्ट्रीयत्वाचा अर्थ उलगडणारा आहे.

शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले पण राजगडावर पोहोचे पर्यंत एका अर्थाने शत्रूच्या मुलखातून येत होते व दिवसेंदिवस प्रवास करत होते. हे कसे जमले? याचे उत्तर आहे, आपल परका हा फरक जाणणारा हिंदू समाज या सर्व वाटेवर होता. औरंगजेब परका व शिवाजी महाराज आमचे हे कळणारा समाज हेच शिवाजी महाराजांचे संरक्षण कवच होते व त्यांना विश्वास देण्यासाठी शिवराज्याभिषेक होता. संपूर्ण देश आपला सोहळा म्हणून पहात होता.

संभाजीराजे थोडे थोडके नाहीत वर्षभर मथुरेत औरंगजेबापासून हाकेच्या अंतरावर रहात होते. मोरोपंत पिंगळे यांच्या बहिणीने सांभाळले पण अख्ख्या मथुरेच्या हिंदूंचा कोट होता. कारण मथुरेतील हिंदूना आपला राजा संभाळायचा होता.

आग्रा ते राजगड हा प्रवास फक्त युध्दस्य कथा रम्या नव्हत्या तर पराभूत देश असतानाही सांस्कृतिक राष्ट्र तसेच पूर्ण जाणीवांनिशी जिवंत होते याचे प्रतिक आहे. म्हणून हा प्रवास सांगतो शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ.

का शिवराज्याभिषेक साजरा करायचा तर शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट कळावे म्हणून. शत्रू मित्र भाव कळावा म्हणून. सांस्कृतिक एकात्मता कळावी म्हणून. व हे सर्व सांगण्यासाठी शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून घेतला. अशा अनेक कड्या अभ्यासू म्हणजे कळते की, शिवराज्याभिषेक म्हणजेच हिंदू साम्राज्य उत्सव आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा हा एक हिंदू साम्राज्य उत्सव होता म्हणून त्या दिवसाला समस्त भारतीय समाजात एक चैतन्य लहरी निर्माण होते. हे कसे? याचा अजून एक पैलू या ठिकाणी उलगडून पाहू या. शिवराज्याभिषेकाच्या आधीही शिवाजी महाराजांचा राज्य कारभार चालूच होता.व तो प्रामुख्याने फारसी शब्दांवर चालत होता. पण राज्याभिषेका निमित्ताने राज्याचे व राजाचे सार्वभौमत्व, वैशिष्ट्य, स्वत्वाची ओळख हे सर्वच येते व त्यातच शिवराज्याभिषेक या सोहळ्याची अखिल भारतीय ओळख होते व त्या दिवसाचे महानपण जाणवते.

राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराज यांनी नवीन राज्य व्यवहार कोष तयार करून घेतला. पण एवढेच याचे महत्त्व नाही, तर हा राज्य व्यवहार कोष संस्कृत भाषेत आहे. जर शिवाजी महाराजांच्या मनात हे मराठी राज्य असते तर हा कोष तत्कालीन मराठीतही बनू शकला असता. पण तसे घडायचे नव्हते. हा कोष बनवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य यांच्यावर सोपवली व त्यांनी ती जबाबदारी धुंडीराज म्हणून विद्वानांच्या मदतीने पूर्ण केली. १३८० फारसी, उर्दू शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द दिलेला बृहद् ग्रंथ अस्तित्वात आला. त्यातूनच शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय अस्मितेच्या प्रकटीकरणाचा सोहळा आहे हे निश्चित झाले व संपूर्ण देश मोहरून गेला.

या प्रत्येक वैशिष्ट्याने हे सिद्ध केले की एक सामान्य राज्याभिषेक नाही तर राष्ट्र अस्मिता जागरणाचा हा सोहळा आहे. म्हणून त्याचे ३५० वे स्मरण संपूर्ण देशाला आवश्यक व गरजेचे आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य उत्सव आहे हे समजणे गरजेचे आहे.

शिवाजी महाराज हे मुगल, आदिलशाही, कुतुबशाही अशा राष्ट्र विरोधी शक्तींशी लढले. काशी विश्वनाथ मुक्त करण्यासाठी लढले. हिंदू मंदीराच्या पुनर्निर्माणासाठी लढले. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर यांच्या घर वापसीसाठी लढले. व्यंकोजीराजे भोसले यांना आम्ही तुर्कांविरोधी लढतो आहोत हे तंजावरला जाऊन सांगितले. शत्रू कोण हे स्पष्ट करण्यासाठी सांगितले. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश याचा अर्थ किती खोल आहे हे समजावून सांगण्यासाठी लढले. यासाठी राजभाषाकोष संस्कृत मध्ये निर्माण करण्यास सांगितले. नव्हे केले. राज्याभिषेक हा प्रदर्शनी उत्सव नव्हता तर हिंदू हाच या देशाचा राजा आहे हे सत्य जगाला सांगण्यासाठी केला होता. म्हणून सांस्कृतिक भारत समजून सांगणा-या सप्त मातांचे पाणी आणले होते.

हे समजून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज हे या अखंड देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या विश्वचिंतनीय संस्कृतीच्या रक्षणासाठी, पुनर्स्थापना होण्यासाठी लढत होते. शिवाजी महाराज हे भारताचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र त्या दिव्य भारत रत्नमालेतील एक लखलखता हिरा आहे पण छत्रपती शिवाजी महाराज यांना गुंफायचा होता तो दिव्य भारत माता हार.

सुनील देशपांडे
(लेखक ब्लॉगर असून ते विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख