संघाची प्रतिनिधी सभा २१ मार्चपासून बेंगळुरूत
बांगलादेशातील घडामोडी, हिंदूंवर (Hindu) तसेच इतर अल्पसंख्याकांवर तेथे होणारे अत्याचार आणि त्याबाबतची पुढील कार्यवाही यासंबंधीचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मांडला जाणार आहे. केवळ बांगलादेशच नाही तर जगातील सर्व हिंदूंना सुरक्षा मिळाली पाहिजे, तसेच त्यांचा अभिमान आणि संवेदनशीलता यांचा आदर राखला गेला पाहिजे, अशी भूमिका संघाने मांडली आहे.
संघाची प्रतिनिधी सभा २१ ते २३ मार्च दरम्यान बेंगळुरूमधील जनसेवा विद्या केंद्र परिसरात होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशातील हिंदुंवर झालेले अत्याचार आणि पुढील कार्यवाही तसेच संघाची शताब्दी या विषयांवर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत चर्चा होईल. तसेच त्यासंबंधीचे दोन प्रस्ताव सभेत मांडण्यात येतील, असे आंबेकर म्हणाले.
पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी प्रतिनिधी सभेत उपस्थित राहतील. प्रतिनिधी सभेत ३२ संघप्रेरित संघटनांचे अध्यक्ष, संघटन मंत्री, सहसंघटन मंत्रीही सहभागी होतील.
समाजाची सहभागीता वाढवण्यावर भर
या वर्षी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. प्रतिनिधी सभेत संघकार्याच्या विस्तारावर विचारविनिमय होईल. विजयादशमी २०२५ ते विजयादशमी २०२६ हे संघाचे शताब्दी वर्ष मानले जाईल.
समाजातील सर्वांपर्यंत आपल्या विचारांना, कार्याला पोहोचवणे, वैचारिक स्पष्टता आणणे हे काम शताब्दी वर्षात मुख्यतः केले जाईल. समाजाची सहभागीता कशी वाढवता येईल त्या संदर्भातील आवाहनही शताब्दी वर्षात केले जाईल. ‘पंच परिवर्तन’ या विषयावरही प्रतिनिधी सभेत व्यापक चर्चा होईल. तसेच त्यात लोकसहभागिता कशी वाढवता येईल, लोकांना कसे जोडता येईल, संस्थांना कसे जोडता येईल, यासंबंधीच्या कार्यविधीवरही चर्चा होईल. ‘पंच परिवर्तना‘मध्ये मुख्यतः सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणाला अनुसरून आपली जीवनशैली, ‘स्व’च्या आधारे जीवनशैली आणि नागरी कर्तव्य याबाबत मुख्यतः योजना तयार केली जाईल, अशी माहिती आंबेकर यांनी दिली.
सन १५२५ मध्ये जन्मलेल्या शूर योद्धा राणी अब्बक्का यांच्या ५०० व्या जन्मवर्षानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ एक विशेष निवेदन देखील या सभेत प्रस्तुत करण्यात येईल, असे आंबेकर यांनी सांगितले.
यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान देशात ९५ कार्यकर्ता विकास वर्ग आयोजित केले जातील. चाळीस वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी होणाऱ्या कार्यकर्ता विकास वर्गांची संख्या ७२ असून चाळीस ते साठ या वयोगटासाठी होणाऱ्या वर्गांची संख्या २३ असल्याचेही त्यांनी सांगितले.