Monday, April 13, 2026

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश

Share

विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त आयकर आयुक्त डॉ. सुहास कुलकर्णी अध्यक्ष स्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व्यासपीठावर होते. 

भारतीय विचारविश्वात “स्वबोध” ही संकल्पना केवळ तात्त्विक चर्चा नसून राष्ट्रनिर्मितीचा आधार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात अभिजन वर्गाने राष्ट्रीय स्वत्व दडपण्याचा प्रयत्न केल्याची टीका करत त्यांनी ‘स्व’ची पुनर्जागृती ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. “भारताचे ‘स्व’ हे त्याच्या अध्यात्मात रुजलेले असून त्यातून एकात्म आणि सर्वांगीण दृष्टी निर्माण होते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना याच विचारातून उदयास आली,” असे ते म्हणाले.

या संदर्भात त्यांनी स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांच्या विचारांचा उल्लेख केला. “प्रत्येक राष्ट्राचे एक कर्तव्य असते, एक ध्येयकार्य असते आणि एक अंतिम उद्दिष्ट असते; भारताचे ध्येय मानवजातीचे अध्यात्मिकरण करणे आहे,” हा विचार मांडत त्यांनी सांगितले की, हेच भारताच्या ‘स्व’चे केंद्रस्थान आहे. श्री अरविंदांनी मांडलेला ‘राष्ट्र ही एक जिवंत चेतना आहे’ हा दृष्टिकोनही त्यांनी अधोरेखित केला.

“‘स्व’ हा केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाज, संस्कृती आणि राष्ट्राच्या चेतनेशी निगडित आहे. ‘स्व’ म्हणजेच राष्ट्राची शक्ती असून राष्ट्रविचार त्याची दिशा आणि जीवनकार्य निश्चित करतो.” त्यामुळे ‘राष्ट्रीय चेतना’ जागृत करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विस्मरणात गेलेल्या परंपरा, मूल्ये आणि ज्ञानपरंपरा पुन्हा जागृत करणे हीच ‘स्वबोध’ची खरी प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

“भारताची स्वातंत्र्यलढाई ही केवळ राजकीय स्वराज्यासाठी नव्हती, तर सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळखीच्या पुनर्प्राप्तीसाठी होती, असे ते म्हणाले. ‘स्व’शिवाय स्वातंत्र्य अपूर्ण राहते.”

विकसित भारतासाठी ‘स्व’ प्रत्येक क्षेत्रात प्रतिबिंबित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणात भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृतीत कला-साहित्य, अर्थव्यवस्थेत आत्मनिर्भरता आणि राजकारणात सभ्यतागत मूल्ये, या चार स्तंभांवर ‘स्व’-आधारित विकास उभा राहू शकतो. हे केवळ शासनापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजपरिवर्तनाची प्रक्रिया आहे. ‘स्वबोध’ हीच विकसित भारताची खरी दिशा आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कुलकर्णी म्हणाले की, हिंदू समाज एका प्रकारच्या सुप्त अवस्थेत आहे. सातव्या शतकापासून भारतावर अनेक आक्रमणे झाली – मोहम्मद बिन कासिमपासून गझनी, घोरी, मुघल आणि ब्रिटिशांपर्यंत. या सततच्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर समाजाने आपला गौरवशाली प्राचीन इतिहास विसरला असून, त्याची पुन्हा जाणीव करून देणे आवश्यक आहे. ‘स्व’ म्हणजेच राष्ट्रीय स्वत्वाची आठवण करून देणे हेच त्या सुप्त अवस्थेतून बाहेर काढणारे महत्त्वाचे तत्त्व आहे.

सौ श्रद्धा लाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले, डॉ. ऋचा पंडित यांनी वैयक्तिक गीत सादर केले, तर सौ. प्राची फाटक यांनी गायलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. 

अन्य लेख

संबंधित लेख