Sunday, April 13, 2025

वर्धमान महावीर : तत्त्वज्ञान, सभ्यता आणि तर्कशुद्धतेचा दीपस्तंभ

Share

वर्धमान महावीर (Bhagwan Mahavir) हे जैन (Jain) संप्रदायाचे अंतिम म्हणजेच चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये बिहारमधील कुंडग्राम येथे एका राजघराण्यात झाला. लहानपणापासूनच ते करुणामय आणि मौनप्रिय होते. पालकांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज वैभवाचा त्याग केला. आत्मज्ञानाच्या शोधात संन्यास घेतला. बारा वर्षे कठोर तपश्चर्येनंतर शालवृक्षाखाली ध्यान करताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर ते ‘महावीर’; महान योद्धा, आणि ‘जिन’; विकारांवर विजय मिळवलेला, म्हणून ओळखले जाऊ लागले.

महावीरांनी जैन संप्रदायाला केवळ अध्यात्मिकच नव्हे तर तात्त्विक उंचीवर नेले. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा ‘अहिंसा’ हा होता. प्रत्येक जीवात आत्मा आहे, तो सुखप्राप्तीचा इच्छुक आहे, ही संकल्पना त्यांनी ठामपणे मांडली. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची हिंसा शारीरिक, मानसिक किंवा भाषिक ही त्यांच्यासाठी निंदनीय होती. म्हणूनच जैन संप्रदायात सूक्ष्मजीवांपासून सर्व प्राण्यांपर्यंत संरक्षणाची भावना रुजवली गेली. आजच्या पर्यावरणीय संकटांमध्ये ही शिकवण अधिकच महत्त्वाची ठरते.

‘अनेकांतवाद’ या सिद्धांताद्वारे महावीरांनी तर्कशुद्ध सापेक्षतेची मांडणी केली. कोणतेही सत्य एकाच दृष्टिकोनातून पूर्णतः समजले जाऊ शकत नाही. त्यासाठी विविध दृष्टिकोनांची आवश्यकता असते. त्यातून ‘स्याद्वाद’ ही तर्कपद्धती उदयास आली, जिथे प्रत्येक विधानाच्या सात शक्यतेंचे विश्लेषण केले जाते. या विचारामुळे बौद्धिक नम्रता आणि वैचारिक सहिष्णुतेला बळ मिळाले. हिंदू धर्माशी जैन संप्रदायाचे अनेक समान पैलू आहेत. जसे की पुनर्जन्म, कर्म, आणि मोक्ष. परंतु, जैन संप्रदाय वेदप्रमाण्यता नाकारतो, ईश्वर-संकल्पनेऐवजी आत्मशुद्धतेवर भर देतो. अनेक पाश्चिमात्य अभ्यासकांनी जैन संप्रदायाला हिंदू धर्माचा उपप्रवाह मानले होते, मात्र आधुनिक संशोधनानुसार ही एक स्वतंत्र श्रमण परंपरा आहे.

स्त्रियांना साधनेसाठी समान संधी महावीरांनी दिली. जातिभेदाला विरोध केला. त्यांनी पंचमहाव्रत सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांची शिकवण दिली. आजही ही शिकवण अत्यंत समर्पक आहे. या तत्त्वांनी महात्मा गांधींसारख्या नेत्यालाही प्रेरित केले. गांधीजींनी आपल्या सत्याग्रहात अहिंसेच्या तत्त्वांचा प्रभावी वापर केला. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात, जैन संप्रदायाने सुसंगती, तर्कशुद्धता आणि नैतिक स्वातंत्र्य यांचा अवलंब केला. अनेकांतवाद, नयवाद आणि स्याद्वाद यांसारख्या सिद्धांतांनी भारतीय तर्कशास्त्र समृद्ध केले. ही तत्त्वे आजच्या संवादप्रधान जगात आवश्यक बनली आहेत.

कला व स्थापत्यकलेच्या क्षेत्रातही जैन संप्रदायाला मोठा वारसा आहे. दिलवाडा, रणकपूर आणि श्रवणबेलगोळा येथील मंदिरे स्थापत्य, शिल्पकला आणि तत्त्वज्ञान यांचे प्रतीक आहेत. संगमरवरी कोरीवकाम, सौंदर्यशास्त्र, आणि अलंकारहीन साधेपणा ही जैन स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत. आजच्या युगात, जिथे मूल्यह्रास, पर्यावरणीय संकट आणि तणाव आहे, तेथे महावीरांचे विचार अधिकच सामर्थ्यशाली ठरतात. अहिंसा, अपरिग्रह आणि तर्कशुद्धता ही तत्त्वे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात स्थैर्य निर्माण करतात. वर्धमान महावीर हे केवळ एक धार्मिक गुरू नव्हते, तर ते विचार, सहिष्णुता आणि सत्यशोधाचे जिवंत प्रतीक होते.

स्रोत: Vayuveg.com

अन्य लेख

संबंधित लेख