जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नानापरिची रचना रचिली अपार ।
जेजुरी गड हा केवळ महाराष्ट्रातील नाही, तर संपूर्ण देशातील एक अनोखे तीर्थक्षेत्र आहे. कैलास पर्वतानंतर येथेच शिव आणि पार्वती यांचे स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते, ही एक विलक्षण गोष्ट आहे. म्हणूनच जेजुरीला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.
महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत असलेल्या (असणाऱ्या) खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर महाशिवरात्रीला एक अनोखी प्रथा पाहायला मिळते. या दिवशी त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवाजे भक्तांसाठी उघडले जातात. ह्या यात्रेला वेगळे धार्मिक महत्व आहे.
दूरदूरवरून भाविक या पवित्र त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी करतात. या रहस्यमय शिवलिंगाची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?
https://www.instagram.com/reel/DGiDBk7oxS_/?utm_source=ig_web_copy_link
महाराष्ट्रातील शंकरभक्तांसाठी महाशिवरात्री हा केवळ एक सण नसून श्रद्धा, भक्ती आणि आस्था यांचा संगम आहे. देशभर तसेच महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांत या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. यामध्ये जेजुरी गडाचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. जेजुरी नगरीत वर्षाकाठी आठ यात्रा भरतात. सोमवती अमावस्या, चैत्र पोर्णिमा, पौष पोर्णिमा, माघ पोर्णिमा, दसरा, चंपाषष्ठी व महाशिवरात्री. या यात्रेला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने जेजुरी गडावर एक अनोखा धार्मिक सोहळा संपन्न होतो. श्रद्धेनुसार, कैलास पर्वतानंतर शिवपार्वतींनी पृथ्वीतलावर वास्तव्य केलेले एकमेव स्थान म्हणजे जेजुरी (जयाद्री) पर्वत. म्हणूनच जेजुरी गडावर महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. येथे ‘स्वर्गलोकी,’ ‘भूलोकी’ आणि ‘पाताळलोकी’ अशी तीनही शिवलिंगे स्थित आहेत, ज्यामुळे हा गड त्रैलोक्य दर्शनाचा केंद्रबिंदू मानला जातो.
ह्यातील ‘पाताळलोकी’ शिवलिंग गुप्त मंदिरातील तळ घरात वसलेले आहे. जेजुरी गडावर असणारे स्वयंभू शिवलिंग ‘पाताळलोकी शिवलिंग’ मानले जाते. विशेषम्हणजे, केवळ महाशिवरात्रीच्याच दिवशी भाविकांच्या दर्शनासाठी या गुप्त शिवलिंग मंदिराचे दार उघडले जाते. इतर कोणत्याही वेळी या गुप्त शिवलिंगाचे दर्शन भाविकांना घेता येत नाही. भुलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा तिन्ही लोकांची एकाच दिवशी महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची श्रद्धा भाविकांची आहे.
मुख्य मंदिरामध्ये असणारे स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी दररोज खुले असते. केवळ पाताळलोकी शिवलिंगांचे दर्शन केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच उपलब्ध होते.
हे गुप्त शिवलिंग पाहण्यासाठी मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या एका लहानशा दरवाजातून खाली उतरावे लागते. येथे एकावेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकते. तळघरातील गूढ वातावरण, अंधार आणि तिथे असलेली आध्यात्मिक ऊर्जा भक्तांच्या मनात गूढतेची आणि श्रद्धेची भावना निर्माण करते.जेजुरी गडावरील गुप्त शिवलिंगाची एक मोठी रहस्यकथा आहे. हे शिवलिंग नेमके कोठून आले, मंदिराच्या तळघरात कसे प्रस्थापित झाले, याबद्दल कोणालाही ठाम माहिती नाही.
महाशिवरात्रीच्या दिवशी जेजुरी गडावर त्रैलोक्य दर्शनासाठी पहाटे ३ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत विशेष दर्शनव्यवस्था केली जाते. पहाटे १ वाजता ग्रामस्थ आणि मंदिर मानकऱ्यांच्या उपस्थितीत विशेष महापूजा आणि अभिषेक पार पडतो. त्यानंतर त्रैलोक्य दर्शनासाठी गुप्त शिवलिंग आणि शिखरावरील शिवलिंगाचे दरवाजे उघडले जातात.
तिन्ही शिवलिंगाचे, म्हणजे त्रैलोकीचे दर्शन फक्त महाशिवरात्रीला होत असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार,सदानंदाचा येळकोट’ अशा जयघोषाने वातावरण मल्हारमय होते. त्यानंतर पुन्हा पूजन करून दोन्ही शिवलिंग बंद केली जातात. शहरातील मुख्य चौकामध्ये श्री खंडेरायाच्या त्रैलोक्य दर्शनासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. महाशिवरात्र उत्सव कालावधीत सशुल्क दर्शन बंद असते.
जेजुरी गडावरील महाशिवरात्र हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून श्रद्धेचा महासंगम आहे.
|| हर हर महादेव ||