मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “ज्या काँग्रेस उमेदवारांचा पवारांनी वेळोवेळी पराभव घडवून आणला, आज स्वतःसाठी त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,” असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
इतिहासातील ‘त्या’ पराभवांचा पाढा
केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील तीन महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे, जिथे त्यांनी काँग्रेसला धक्का दिला होता:
१. १९९६ विधानपरिषद: विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता, ज्याचे सूत्रधार शरद पवार होते असा दावा उपाध्ये यांनी केला आहे.
२. १९९८ राज्यसभा: सोनिया गांधींचे विश्वासू उमेदवार राम प्रधान यांना पराभूत करून पवारांनी आपले विश्वासू अपक्ष उमेदवार अरुण मेहता यांना निवडून आणले होते.
३. २००६ राज्यसभा: प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही पवारांनी राहुल बजाज या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला होता.
सध्या राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत पेच आहे. शरद पवार स्वतः राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असून त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या मतांची गरज आहे. याच संधीचा फायदा घेत भाजपने पवारांच्या ‘पॅटर्न’ची आठवण करून दिली आहे. नियतीने फिरवलेले हे चक्र म्हणजे ‘काव्यगत न्याय’ असल्याची टीका आता चर्चेचा विषय ठरत आहे.