Friday, November 1, 2024

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Share

Kolhapur : कोल्हापूर मध्ये काँगेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील यासमयी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

या मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव यासुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, परंतु, काँग्रेसने त्यांना विश्वासात न घेता मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख तसेच शिवसेना उपनेतेपदी नियुक्त केल्याचे जाहीर केले. तर सत्यजित जाधव यांच्याकडे उद्योग क्षेत्राच्या संबंधित जबाबदारी सोपविण्यात येईल असेही जाहीर केले.

श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम झाली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी व्यक्त केले. विद्यमान आमदार असूनही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला महिला भगिनींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली ही खरोखरच कौतुकाची बाब असल्याचे सांगितले. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या असून या योजना कोल्हापूरातील सर्वसामान्य महिला भगिनींपर्यंत पोहचवण्यासाठी त्या प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, मित्रा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर, शिवसेना उद्योग आघाडीचे अध्यक्ष उदय सावंत तसेच कोल्हापूर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख