Saturday, March 14, 2026

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Share

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

करनूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त हिंदू समाज श्रद्धापूर्वक ‘बलिदान मास’ पाळत आहे. धारकरी नतमस्तक होत असताना आणि प्रार्थना सुरू असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी हेर्ले, कुंभोज आणि कबनूर येथेही छत्रपती शिवाजी महाराज यांचे भित्तीपत्रक फाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण केला जात असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

“बलिदान मास पाळण्यास विरोध करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रयत्न अत्यंत संतापजनक आहे. अशा जिहादी मानसिकतेचा सकल हिंदू समाज जाहीर निषेध करतो. प्रशासनाने या गुंडांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, हिंदु महासभा राज्य संघटक मनोहर सोरप, हिंदुत्वनिष्ठ विश्वास पाटील, शशी बीडकर, सोमनाथ शिवणगेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि महेंद्र अहिरे, हिंदु महासभा महिला शहराध्यक्ष पूजा शिंदे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे योगेश केरेकर, उद्योजक प्रसन्न शिंदे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी अशा प्रवृत्तींना ठेचणे आवश्यक असून पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख