Friday, January 30, 2026

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार?

Share

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता आगामी अर्थसंकल्पाबाबत (Maharashtra Budget 2026) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची दाट शक्यता आहे.

२३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे अर्थ खात्याची धुरा सध्या कोणाकडे सोपवायची, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, अर्थसंकल्पासाठी अवघा एक महिना शिल्लक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस हेच हे खाते आपल्याकडे ठेवण्याची शक्यता अधिक आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा अनुभव जमेची बाजू
राजकीय विश्लेषकांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्पीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प यशस्वीपणे सादर केला होता. त्यामुळे ही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया ते सक्षमपणे हाताळू शकतात, असा विश्वास प्रशासकीय पातळीवर व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीकडे अर्थ खाते राहणार की मुख्यमंत्र्यांकडे?
महायुती सरकारमध्ये अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) होते. आता हे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीच्याच एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला दिले जाणार की तूर्तास मुख्यमंत्री ते स्वतःकडेच ठेवणार, यावर चर्चा सुरू आहे. ३० जानेवारी रोजी राजकीय दुखवटा संपल्यानंतर मंत्रिमंडळातील या बदलांबाबत अधिकृत हालचाली सुरू होतील.

अर्थसंकल्पासाठी विविध विभागांकडून प्रस्ताव संकलित करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे. शेतकरी, सामाजिक योजना आणि औद्योगिक क्षेत्रासाठीच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत. अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने आणि त्यांनी आखलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता नव्या अर्थमंत्र्यांसमोर असणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख