Thursday, November 14, 2024

हिंदुत्व विरोधी विद्वेष : महाराष्ट्र निवडणुक- भाग २

Share

पहिल्या भागात आपण थोडी ह्या येणाऱ्या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेतली. आता त्यातील एक एक मुद्द्यांचा सविस्तर विचार आपण करू या.

महाराष्ट्र हे राज्य नेहमीच भारताच्या शैक्षणिक , औद्योगिक , आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे केंद्र राहिलेले आहे. काँग्रेस पक्षाने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपली पाळे मुळे येथे घट्ट रोवली होती आणि त्यामुळे येथे अन्य एखाद्या पक्षाने काँग्रेस समोर आव्हान निर्माण करणे सोपे नव्हते. देशभरात हिंदुत्वाच्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे आणि भाजप / शिवसेना यांच्या युतीमुळे येथे ते आवाहन ८९ पासून निर्माण होत गेले आणि बघता बघता काँग्रेस गड हे कोलमडून पडले. ९५ साली युती शासन आणि २०१४ मध्ये पुन्हा भाजप / शिवसेना शासन याने मुंबई पासून सर्वत्र प्रस्थापित नेतृत्व झिडकारले गेले.

ह्या सगळ्या घडामोडीत राजकारण आणि त्यातून व्यवसाय करत गब्बर झालेल्या विशेष करून काँग्रेसी मंडळींना अस्वस्थ केले आणि महाराष्ट्रात ४८ साली जसे दंगे झाले आणि त्यातून जातीचा विद्वेष निर्माण झाला त्या प्रमाणे  पुन्हा एकवार काँग्रेस पुरस्कृत जातीय वणवे पेटायला लागले. आरक्षण हा जरी एक समोर प्रश्न असला तरी आणि सत्तेत अनेक वर्षे झुकते माप मिळून ही मराठा समाजातील मोठा घटक जो अल्पभूधारक किंवा शेतमजूरी करत होता त्याच्या इच्छा आकांक्षा ह्या प्रस्थापित मराठा नेतृत्वानेच पूर्ण होवू दिल्या नाही आणि परिणामी त्याचा मोठा स्फोट २०१४ नंतर फडणवीस सत्तेत असताना झाला . ह्याला अत्यंत हुशारीने वात , तेल आणि इंधन काँग्रेसी मानसिकतेने पुरवले.  ह्या आंदोलनाचे नेते बदलत गेले पण काही लोकांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी ठरवून निर्माण केलेला विद्वेष हिंदुत्वाच्या राजकीय अभिव्यक्तीला छेद देत गेला.

वास्तविक महाराष्ट्राची परंपरा *छत्रपती शिवरायांची,* . १२ बलुतेदार आणि १८ पगड जाती याना बरोबर घेत त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले होते. महाराष्ट्रात पुढील काळात जे काही राजकीय , सामाजिक नेतृत्व उभे राहिले त्याची प्रेरणा छत्रपती होते. अगदी *आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या पडून टिळक , सावरकर ह्यांच्या  हे स्वातंत्र्य चळवळीतील दोन प्रवाह ह्याला अपवाद नव्हते . संघाचे संस्थापक *पूजनीय डॉ. हेडगेवार यांची संघ स्थापनेची प्रेरणा *छत्रपती शिवराय* हीच होती.

इंग्रजांना येथील समाजात परंपरेने निर्माण होणारी छत्रपतींची प्रेरणा आपली सत्ता डळमळीत करू शकते हे पक्के माहीत होते. त्यामुळे महाराजांचा विकृत इतिहास प्रसारित करण्यापासून त्यांच्या पराक्रमाच्या खुणा पुसून टाकण्या पर्यंत सर्वकाही त्यांनी केले. दुर्दैवाने हीच भीती ४७ साली सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाला होती आणि त्यामुळे त्यांनी पण इंग्रजांचे छत्रपती शिवराय यांच्या संदर्भातले धोरण तसेच पुढे नेले. परिणाम स्वरूप महाराजांच्या प्रेरणादायी ठरणाऱ्या आणि हिंदू समाजाला एकात्म बनवणाऱ्या इतिहासाला संपवण्याचा कुटील डाव काँग्रेस विचारसरणी ( Thought process) ने केला. ज्याचे गंभीर सामाजिक , राजकीय आणि धार्मिक परिणाम आम्हाला आज ही भोगावे लागत आहेत.

ह्या इतिहासा बरोबर महाराष्ट्रात जातीय विद्वेष निर्माणच होणार नाही अशी आणखी एक चळवळ महाराष्ट्रात चालू होती ती होती भक्ती मार्गाची.  *ज्ञानेश्वर माऊलींनी* मुस्लिम खिलजी आक्रमणाची चाहूल लक्षात घेवून राजकीय स्वातंत्र्य गेले तरी धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य अबाधित राहवे म्हणून वारकरी संप्रदायाची स्थापना केली होती. *संत नामदेव , संत चोखामेळा , संत जनाबाई , निवृत्ती , सोपान , मुक्ताबाई* ह्या समकालीन संताना बरोबर घेवून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा त्यांनी समृद्ध केला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारी निमित्ताने एकात्म हिंदू समाजाची वीण घट्ट केली.पुढे संत *तुकाराम महाराज* यांनी ही चळवळ अधिक जोमाने पुढे नेली. 

महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी मंडळींना हाताशी धरून काँग्रेस विचारसरणी ने अंधश्रद्धा नावाने ही चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न केला. जेंव्हा हा भक्तिमार्ग खूप खोलवर रुजला आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यावेळीं त्यांनी तेथे ही, विकृत विचार पेरण्याची अधम कृत्ये केली. संतांना जातीय चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु संतांची पुण्याई आणि हिंदू परंपरा ही ह्या विकृत विचारा पेक्षा मोठी असल्याने ते यात यशस्वी झाले नाही. पण अनेक वर्षे सत्ता उपभोगत असताना *वारकरी संप्रदाय* दुर्लक्षित ठेवण्याचे पाप काँग्रेस विचारसरणी ने ( Thought Process) केले.

तिसरा अडथळा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात होता तो *रा. स्व. संघ* ह्या संघटनेचा. ४८ साली झालेल्या गांधी हत्येनंतर हिंदुत्वाशी जोडलेला बहुजन समाज काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) ने जाणीवपूर्वक बाजूला केला आणि जातीच्या ध्रुवीकरणाच्या पहिल्या खेळीला इंग्रजांच्या पेक्षाही विकृत पद्धतीने सुरुवात केली.  परिणामी कायमचा बहुजन विरुद्ध ब्राह्मण हा आकस महाराष्ट्रात निर्माण झाला. ह्यातून संघ विचाराला गावोगावी विरोध आणि संघ कार्यकर्त्यांना छळ, कपट आणि सामाजिक बहिष्कार अशा गोष्टींना सामोरे जावे लागले. त्यामुळे संघ कार्याची गतीला आणि त्यातून सामाजिक , राजकीय नेतृत्व निर्माण होणाऱ्या प्रगतीला एक प्रकारे अडथळे निर्माण करण्यात काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) यशस्वी झाली.

दीर्घकाळ महाराष्ट्रात सत्ता भोगणारी ही काँग्रेस नावाची विचारसरणी (Thought process) *रामजन्मभूमी आंदोलन* आणि त्यातून हिंदुत्वाची निर्माण झालेली लाट ह्यामुळे उद्ध्वस्त झाली आणि हिंदुत्वाच्या विचाराने भारलेले तरुण शिवसेना , भाजप ह्या राजकीय पक्षांच्या कडे आकृष्ट झाले.  साधू, संत,, महंत हे मठ मंदिरातून बाहेर पडले आणि एक प्रकारे सामाजिक आणि राजकीय मोठ्या क्रांतीला सुरुवात झाली.

केंद्रस्थानी काही काळ असणारे अटलजी सरकार काळात ह्याला अधिक गती मिळाली पण *नरेंद्र मोदी* सारखे प्रखर हिंदुत्ववादी चेहरा महाराष्ट्रात पण सर्वमान्य होताना काँग्रेस विचारसरणी ही नामशेष होण्याकडे वाटचाल करू लागली.

ह्या परिस्थितीला बदलण्यासाठी काँग्रेस विचारसरणीतील मंडळीनी पुढे ज्या खेळ्या केल्या त्यातून आजचे महाराष्ट्रातले राजकीय समीकरण क्लिष्ट बनत गेले आणि त्यामुळें महाराष्ट्राचे प्रचंड आर्थिक , सामाजिक नुकसान झाले.  त्यामुळेच ही निवडणुक महाराष्टातील विचारी मंडळींना एक शेवटची संधी आहे. 

रवींद्र मुळे, अहिल्या नगर.

भ्रमणध्वनी: ९४२२२२१५७०

अन्य लेख

संबंधित लेख