2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वार्थात पुरते आंधळे होऊन उध्दव ठाकरे यांनी बहुमत मिळालेल्या महायुतीसोबत गद्दारी केली आणि सत्तालोलुप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनैतिक संबंध जोडले. सत्तेविना उपासमार होत असलेली काँग्रेस देखील राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा ठाकरे घराण्याबरोबर राग असतानाही सोबत गेली. उध्दव व त्यांचे पुत्र आदित्य हे तशी विनंती करण्यासाठी दिल्ली दरबारी जाऊन सोनिया चरणी मुजराही करून आले. यामुळे उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याची हौस भागली असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातला समतोल ढळला आणि सत्ता समीकरणांची अनपेक्षित अशी फेरमांडणी झाली.
भारतीय जनता पक्षाच्या मागे उध्दव ठाकरे यांच्या पक्षातील मोठा गट गेला. ठाकरेंनी सोडलेल्या हिंदुत्वामुळे होणारी त्यांची होणारी वैचारिक कोंडी हे प्रमूख कारण असले तरी ठाकरेंचा अप्पलपोटेपणा व संस्थानिक असल्याच्या थाटात स्वतः वावरणे ही कारणेही त्याला होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणुन बसवायचे कारण सांगून गद्दारी केल्यानंतर स्वतःच खुर्चीवरून उडी मारून बसल्याचे शिवसैनिकांना आवडले नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार, खासदार, पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक असा मोठा गट महायुतीमध्ये परत आला. वाट चुकलेला स्वगृही आला अशी सर्वांची भावना होती. लोकांनी ही नैसर्गिक युती म्हणुन एकनाथ शिंदे यांना स्वीकारले.
पण महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकिय समतोलाची चर्चा सुरु झाली ती अजित पवारांनी आपल्या काकाबरोबर बंडाचे निशाण फडकवल्यानंतर. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या कृतीला वैचारीक अधिष्ठान कधीही नसते. पुरोगामित्वाची झुल देखील सत्तेसाठी असते. कधी कधी महाराष्ट्रात काडी टाकून आग लावण्याचे उद्योग शरद पवार आणि त्यांची पेरलेली ठराविक माणसे करत असले तरी त्यात वैचारिक अधिष्ठानापेक्षा आग लावून गंमत बघण्याची त्यांची सवय हे कारण असते. त्यामुळे अजित पवारांचे महायुतीमध्ये येणे ना भाजपा कार्यकर्त्यांना अजून पचले ना सामान्य जनतेला. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला ही संधीसाधू खेळी आहे असेच वाटत आहे.
त्यानंतर खरेतर महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाल्याचे लोकांना वाटायला सुरुवात झाली. जिथे पवार आणि पवारांचे चेले असतात ती गोष्ट भ्रष्ट असते असा सामान्यांचा असलेला समज खराही आहे. त्यामुळे पवारांच्या पुतण्याचे महायुतीत येणे याला सामान्य जनता अजूनही संशयाच्या नजरेने पाहत आहे.
पण याला मुलत: उध्दव ठाकरे यांचा सत्तालोभी पणा जबाबदार आहे. पवारांचा काड्या सारण्याचा जुनाच उद्योग आहे. त्याबद्दल कोणाला काही वाटण्याचे कारण नाही. पण उध्दव ठाकरे हे विचाराबरोबर विश्वासघात करून राजकिय खिचडी होण्यास जबाबदार आहेत असेच सार्वत्रिक मत आहे
ऋषिकेश कासांडे