मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)
निवृत्त होणाऱ्या सात खासदारांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे:
महाविकास आघाडी: शरद पवार (राष्ट्रवादी SP), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे गट), फौजिया खान (राष्ट्रवादी SP).
महायुती: रामदास आठवले (RPI-A), डॉ. भागवत कराड (भाजप), धैर्यशील पाटील (भाजप).
संख्याबळाचे गणित: ३७. ५ मतांचा कोटा (सूत्रांची माहिती)
सध्या विधानसभेचे संख्याबळ २८६ असून (अजित पवार व शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे २ जागा रिक्त), एका जागेसाठी ३७. ५ मतांचा कोटा आवश्यक आहे.
महायुती (भक्कम स्थिती): भाजप (१३१), शिंदेसेना (५७) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (४०) असे मिळून एकूण २२८ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. अपक्षांच्या पाठिंब्यासह हा आकडा २३५ वर जातो. त्यामुळे महायुतीचे ६ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
महाविकास आघाडी (अडचण): ठाकरे गट (२०), काँग्रेस (१६) आणि शरद पवार गट (१०) मिळून आघाडीकडे ४६ मते आहेत. मित्रपक्षांची मदत घेतल्यास आघाडीचा १ उमेदवार निवडून येईल, मात्र त्यानंतर त्यांच्याकडे केवळ ११ ते १४ अतिरिक्त मते उरतील.
सर्वात मोठी चर्चा शरद पवार यांच्या उमेदवारीची आहे. पवारांनी यापूर्वीच लोकसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते आणि राज्यसभेबाबत मुदत संपल्यावर निर्णय घेऊ असे म्हटले होते. आता आघाडीला केवळ एकच जागा मिळत असल्याने ती जागा उद्धव ठाकरे गट (ज्यांचे सर्वाधिक २० आमदार आहेत) स्वतःकडे मागण्याची शक्यता आहे. अशा वेळी शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार की ही जागा मित्रपक्षाला सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप सातवा उमेदवार देणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने सातवा उमेदवार रिंगणात उतरवला, तर २०२० च्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. ३७. ५ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर महायुतीकडे अतिरिक्त मते शिल्लक राहतात, ज्याच्या जोरावर ते सातव्या जागेसाठी दावा करू शकतात.