Friday, March 20, 2026

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन

Share

मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर पार पडलेल्या भव्य संचलनात देशभरात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे आता मुंबईत आगमन झाले आहे. गिरगाव येथे या चित्ररथाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

महाराष्ट्राची लोकसंस्कृती, प्रगत संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि अत्यंत आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचा हा उत्कृष्ट आविष्कार ठरला आहे. या चित्ररथाच्या निर्मितीत अनेक नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक अभ्यासकांनी योगदान दिले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडत आहे. दिल्लीत मिळालेल्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

“गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, शालेय विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे,” असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. प्रत्यक्ष कर्तव्यपथावर हा चित्ररथ पाहण्याची संधी हुकलेल्या मुंबईकरांसाठी ही एक सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख