Friday, January 30, 2026

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी

Share

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाने इतिहास रचला आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने ‘सर्वोत्कृष्ट चित्ररथ’ म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून  या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला  सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले आहे.

केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हे, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सेना दलातून ‘भारतीय नौदल’ तर निमलष्करी दलातून ‘दिल्ली पोलीस’ यांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवण्यात आले. केंद्रीय मंत्रालयांच्या गटामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने बाजी मारली, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘वंदे मातरम्’ नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख