Wednesday, December 4, 2024

महायुतीने जाहीर केली १० वचने

Share

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार देणार, ४५००० पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना १५००० रुपये वेतन, वीज बिलात ३० टक्के कपात आणि १०० दिवसांत व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार अशी गेमचेंजर वचने मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महायुतीकडून कोल्हापूरात प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी अशा योजना राबवल्या. डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही दिल्लीत जातो ते राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी पैसे मागतो पण काहीजण दिल्लीत जातात मुख्यमंत्री करा, चेहरा बनवा यासाठी जातात मात्र महाविकास आघाडीला जो चेहरा नकोय ते महाराष्ट्राला कसा चालेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.

देंवेंद्रजींनी सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना बंद केली त्याची चौकशी लावली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यासाठी हिंमत लागते आणि काम कराव लागते, असे ते म्हणाले. अडीच वर्षात मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या, महायुतीने दोन वर्षात सिंचनाच्या १२४ सुप्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन वर्षात ३५० कोटी वाटले आणि एक लाख नागरिकांचे प्राण वाचले, असे ते म्हणाले.

आधीच्या सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना मंदिर बंद होती, मंदिरे सुरु करण्यासाठी आंदोलनं करावी लागली, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. विकासाचे मारेकरी म्हणून महा आघाडीची इतिहासात नोंद होईल, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंचगंगेच्या महापूरावर कायमस्वरुपी योजना करण्यासाठी ३२०० कोटींची योजना सरकारने आणली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या मोठ्या लवंग्या ऐवजी अँटम बॉम्ब फोडायचा आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

महायुतीची १० वचने

१) लाडक्या बहिणींना रु.२१००प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!

२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५०००प्रत्येक वर्षाला रु.१२,००० वरुन रु.१५,००० देण्याचे तसेच MSP वर २०% अनुदान देण्याचे वचन!

३) प्रत्येकास अन्न आणि निवाराप्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

४) वृद्ध पेन्शन धारकांना रु.२१०महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे वचन!

५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिरराज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

६) २५ लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,०००प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देण्याचे वचन!

७) ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणारराज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५००० आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.१५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!

९) वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!

१०) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९ १०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

अन्य लेख

संबंधित लेख