महाराष्ट्र : लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. या योजनेवरुन राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीचे (MVA) नेते या योजनेतील त्रुटी काढत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडिओ शेअर करत महिलांना आवाहन केले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसनं ही योजना फसवण्याचा कट आखला आहे. त्यांच्या शिबिरांमध्ये जे अर्ज भरुन घेतलं जातील त्यामध्ये ते कशा पद्धतीने त्रुटी राहतील याची काळजी ते घेणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे की, माझ्या माता भगिनींना पैसे मिळणार नाही आहेत. ही योजना आणि त्याच बरोबरीने महायुती सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांचा डाव आहे. अर्जात त्रुटी ठेवायच्या आणि नंतर योजना कशी फसवी आहे याची बोंब मारायची हेच त्यांनी ठरवलं आहे.
यासोबतच त्या म्हणाल्या की, “म्हणून मला माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे की, त्यांच्या शिबिरातून अर्ज नक्की घ्या पण अर्ज घेतल्यावर स्वत:हा अॅपवर जाऊन, सेतूकेंद्रावर जाऊन, वेबसाईटवर जाऊन अपलोड करा आणि त्याची पावती घ्यायला विसरु नका. ही योजना तुमच्यासाठी तुमच्या युती सरकारने आणली आहे. त्यामुळे इतरांची दुकानं अजिबात चालू देऊ नका”. असे चित्रा वाघ म्हणाल्या.