राज्यात आज श्रीगणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जवळबपास सव्वा दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचे आज दर्शन घेणार आहेत. लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक मूर्तींच्या दर्शनासाठी आजपासूनच दर्शन रांगा लागणार आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही गणरायाचं आगमन होत असून ढोल, ताशा आणि वाद्यांच्या गजरात बप्पांचं स्वागत केलं जात आहे. तर सांगली आणि मिरज शहरात काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्त्यांचं जल्लोषात आगमन झालं. सांगलीतील गणेश मंदिरावर गणेश चतुर्थी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. सामाजिक एकता, समता आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा सण सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकोप्यानं आनंदानं साजरा करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरात ढोल ताशांच्या गजरात गणेशाचं आगमन आणि भक्तिमय वातावरणात सार्वजनिक आणि घरगुती गणरायाची आज प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी वर्षा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर शासकीय निवासस्थानी आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करुन मनोभावे आरती केली. मुंबईतल्या श्री सिद्धीविनायक मंदिरातही फुलांची आरास आणि आकर्षण सजावट करुन गणपतीची पूजा करण्यात आली. गिरगावामधल्या केशवजी नाईकांच्या चाळीतल्या लोकमान्य टिळकांनी प्रेरणेनं श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, लालबागचा राजा, मुंबईचा राजा आदी मुंबई आणि मुंबई उपनगरात सार्वजनिक आणि घरघुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत आगमन झालं आहे. गणेशोत्सव सण पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा होण्याकडेही नागरिकांचा कल पहायला मिळत आहे. आजच्या गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मुंबई महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जुहू चौपाटी, वेसावे चौपाटी, गिरगाव चौपाटी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव, वाहन आधारित फिरते कृत्रिम तलाव, निर्माल्य वाहक फिरते वाहन, लोंबकळणाऱ्या तारा, विसर्जन स्थळावर कार्यरत स्वयंसेवक, पेयजल, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे, निर्माल्य कलश आदीं व्यवस्था करण्यात आली आली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आढावा घेतला असून गणेशोत्सवादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीनं चांगल्या सुविधा पुरवाव्यात असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत.
पुण्यातही मानाच्या तसच लहान मोठ्या मंडळांचे गणपती स्थापित करण्यास सुरुवात झाली आहे.