Friday, January 30, 2026

“सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

Share

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी ‘दादां’ना निरोप दिला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

“सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे”
अंत्यविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. झिरवळ म्हणाले की, “सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, ही सर्वांचीच प्रामाणिक भावना आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत, वेगळं राहणं शक्य नाही, एकत्रच पुढे जावं लागेल,” झिरवळ यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पार्थ आणि जय पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा?
अंत्यसंस्काराच्या वेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी सर्व पाहुण्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि सांत्वन स्वीकारले. पवार कुटुंबातील इतर सदस्य आणि पक्षाचे नेते बाजूला असताना, ज्या पद्धतीने या दोन तरुण नेत्यांनी परिस्थिती हाताळली, ते पाहता पक्षाचे संभाव्य वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

नेतृत्वाच्या पोकळीचा प्रश्न
अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर पक्षाचे अध्यक्ष आणि अर्थमंत्री म्हणूनही महत्त्वाची भूमिका पार पाडत होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी, सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गट एकत्र आल्यावर आता नेतृत्वाची सूत्रे कोणाकडे जाणार? तर, दादांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.

पवार कुटुंब संकटाच्या वेळी नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसले तरी, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तार किंवा खातेवाटपात सुनेत्रा पवार यांना स्थान मिळणार का, याची उत्सुकता आता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख