नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील (NMC) सत्तास्थापनेचा सस्पेन्स अखेर संपला असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
निवडणूक निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, “आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही,” अशी रोखठोक भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली होती. मात्र, राज्याच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या चर्चेनंतर नाशिकमध्येही महायुतीचा धर्म पाळण्याचे ठरले. त्यानुसार भाजपकडे महापौरपद आणि शिवसेनेकडे उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला.
निवड बिनविरोध: सीमा पवारांची माघार
महापौर पदासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सीमा पवार यांनी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे निवडणूक होणार अशी चिन्हे होती. मात्र, ऐनवेळी सीमा पवार यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. माघार अर्ज देताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारले असता, सीमा पवार यांनी स्पष्ट केले की, त्या कोणत्याही दबावाखाली नसून स्वेच्छेने माघार घेत आहेत.
माघारीची मुदत संपताच हिमगौरी आडके यांची महापौरपदी आणि विलास शिंदे यांची उपमहापौरपदी अधिकृत बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नाशिक मनपाच्या सत्तेत आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे देखील सहभागी झाली आहे. या मोठ्या युतीमुळे नाशिक महापालिकेत विरोधकांचे संख्याबळ कमालीचे रोडावले आहे.
ठाकरे गट आता मुख्य विरोधी पक्ष
महायुती एकत्र सत्तेत आल्यामुळे महापालिकेत आता ठाकरे गटाच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्तेतून बाहेर राहिल्याने आता नाशिकच्या नागरी प्रश्नांवर ठाकरे गट कशी भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.