Tuesday, March 17, 2026

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’

Share

नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे नाशिकमधील आध्यात्मिक वातावरणात मोठी भर पडणार आहे.

२० फूट उंच धर्मध्वजाची उभारणी

मिळालेल्या माहितीनुसार, काळाराम मंदिराच्या शिखरावर तब्बल २० फूट उंच धर्मध्वज उभारला जाणार आहे. या उभारणीचा संपूर्ण खर्च काळाराम मंदिर संस्थान स्वतः करणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवण्यात आला होता, ज्यावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाची चिन्हे आहेत. याच धर्तीवर नाशिकमधील या धर्मध्वजाचे स्वरूप कसे असेल, याबाबत आता भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फक्त देशातूनच नाही तर, जगभरातून करोडो भाविक येत असतात. कुंभपर्वात काळाराम मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व असते. भाविकांची श्रद्धा आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, हा धर्मध्वज मंदिराच्या वैभवात भर घालणारा ठरेल. हा ध्वज नेमका कोणत्या तारखेला फडकवला जाईल, याची अधिकृत तारीख अद्याप गुलदस्त्यात असली, तरी विश्वस्तांनी तयारी पूर्ण केली असल्याचे समजते.

अयोध्येच्या आठवणींना उजाळा

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर तेथील धर्मध्वज उभारणीचा सोहळा संपूर्ण जगाने पाहिला. नाशिक हे प्रभू रामांच्या वनवासातील महत्त्वाचे स्थान (पंचवटी) असल्याने, अयोध्येनंतर नाशिकमध्ये असा निर्णय घेणे हे रामभक्तांसाठी अत्यंत आनंदाची बाब मानली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख