Monday, March 9, 2026

विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी

Share

नागपूर: “जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूरमधील मिहान (MIHAN) विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘रोबोटिक्स आणि युएव्ही (UAV) फॅसिलिटी’ प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

रोबोटीक इंजिन आणि ड्रोनच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत असून सध्या जगभरात सुरु असलेल्या संघर्षातून त्याची झलकही बघायला मिळत आहे. सोलरचा हा प्रकल्प देखील भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळलेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राची क्षमता लक्षात घेता सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे, याकडे केंद्रीय मंत्री गडकरी लक्ष वेधले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटीविषयी

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडकडून उभारल्या जाणाऱ्या या युनिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मध्यम उंचीवर आणि लांब पल्ल्याचे उड्डाण करणारे ड्रोन, रोबोट, युएव्ही आणि विविध संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पूर्णपणे स्वदेशी उत्पादनावर भर देणार आहे, ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे नागपूरची ‘डिफेन्स हब’ म्हणून ओळख आणखी घट्ट होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख