Saturday, March 14, 2026

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात

Share

परभणी : परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात येत्या १६ आणि १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव-२०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित हा उत्सव जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी ज्ञानाची मोठी मेजवानी ठरणार आहे.

ग्रंथोत्सवानिमित्त विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि साहित्यिक संवाद यांसारख्या समृद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून साहित्यप्रेमींना नामवंत साहित्यिकांशी प्रत्यक्ष भेट घेण्याची तसेच त्यांच्या विचारांचा आणि अनुभवांचा लाभ घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील उत्कृष्ट वाचकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवातून साहित्यिक, लेखक आणि वाचक यांचा एक सुंदर आणि प्रेरणादायी मेळावा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ग्रंथदिंडीने होणार सुरुवात

ग्रंथोत्सवाची सुरुवात दि. 16 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका मीनाताई वरपुडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सविता बिरगे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे तसेच सुप्रसिद्ध कथाकार राजेंद्र गहाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथदिंडी मार्ग
हुतात्मा स्मारक, राजगोपालाचारी उद्यान, वसमत रोड मार्गे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कल्याण नगर, परभणी

इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते उद्घाटन

ग्रंथोत्सवाचे मुख्य उद्घाटन दुपारी ११:०० वाजता ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पहिल्या दिवशी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि साहित्य’ या अत्यंत आधुनिक विषयावर डॉ. धर्मराज वीर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सायंकाळी राजेंद्र गहाळ व मिलिंद जाधव यांचे कथाकथन रंगणार आहे.

दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

मंगळवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवाद कार्यक्रमात डॉ. अशोक कोलंबीकर, सुभाष ढगे, जीवन लोखंडे यांचा सहभाग राहणार आहे. सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे महत्त्व हा परिसंवादाचा विषय आहे.

दुपारी २.३० वा. जेष्ठ कवी केशव वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. दुपारी ४.०० वा. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, प्राचार्य राहूल नितनवरे हे उपस्थित राहणार आहेत.

पुस्तकांची मोठी बाजारपेठ

या ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध नामांकित प्रकाशनांचे पुस्तकांचे स्टॉल. येथे वाचनप्रेमींना एकाच छताखाली विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके पाहण्याची व खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट वाचकांचा यावेळी गौरवही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि पालकांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बाळासाहेब देवणे यांनी केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख