परभणी : थॅलेसिमियासारख्या (Thalassemia) गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. परभणी येथील हॉस्पिटलमध्ये जिंतूर तालुक्यातील पूगळा येथील अर्जुन जगताप या बालकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णावरील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.
थॅलेसिमिया हा रक्ताचा गंभीर आजार असून, बाधित बालकांना दर १५ दिवसांनी रक्त चढवावे लागते. मात्र, सततच्या रक्तसंक्रमणामुळे शरीरात लोहाचे (Iron) प्रमाण धोकादायक पातळीवर वाढते. हे लोह यकृत, हृदय आणि ‘स्प्लिन’ (पानथरी) सारख्या अवयवांमध्ये साचून गंभीर गुंतागुंत निर्माण करते. औषधोपचार करूनही लोहाचे प्रमाण कमी न झाल्यास शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय उरतो.

अर्जुनच्या बाबतीत लोहाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. अशा परिस्थितीत डॉ. गबाळे यांच्या पुढाकाराने आणि डॉ. दीपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. “ही शस्त्रक्रिया म्हणजे थॅलेसिमिया मुक्तीच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे ‘एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे’ अभियानाचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले.
यापूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागत असे. यामुळे पालकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता परभणीतच ही सुविधा उपलब्ध झाल्याने आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळाल्याने अर्जुनच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जिल्ह्यातील इतर थॅलेसिमिया ग्रस्त बालकांच्या पालकांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला असून, आरोग्य यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे.