बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरण आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानांनंतर, अवघ्या दोन तासांत पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘गोविंदबाग’ (बारामती) येथे पोहोचले आहेत.
पवारांच्या नाराजीनंतर पार्थ पवारांची धाव?
आज सकाळी शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत त्यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही. या विधानामुळे पवार कुटुंबात आणि पक्षात पुन्हा एकदा विसंवाद असल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर, पार्थ पवार तातडीने शरद पवारांच्या भेटीला गेल्याने, ही भेट शरद पवारांची समजूत काढण्यासाठी की काही महत्त्वाचा निरोप देण्यासाठी, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दुपारी २ वाजता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक. यात सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा होईल. संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार आधीच मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाल्या आहेत, तर पार्थ पवार बारामतीत शरद पवारांच्या भेटीला आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?
शरद पवारांनी आज खुलासा केला की, १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती. मात्र, दादांच्या जाण्याने या प्रक्रियेत खंड पडला आहे. आता पार्थ पवार यांच्या भेटीमुळे विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा संजीवनी मिळणार की केवळ शपथविधीसाठी आशीर्वाद घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
छगन भुजबळांचे मोठे संकेत
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत दिले आहेत. “सुनेत्रा वहिनींना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळत आहे, हा आमच्यासाठी मोठा क्षण आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.