पिंपरी-चिंचवड : सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सभागृहाचे कामकाज अखेर सुरू झाले आहे. आज पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.
या निवडीनंतर आमदार महेश लांडगे यांनी लांडगे आणि बाबर कुटुंबाच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, “भाजपाचे निष्ठावंत व शहराचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे, भाजपाचे नेते दिवंगत कै. अंकुशराव लांडगे कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टी आणि शहरासाठी समर्पण भावनेतून काम केले आहे. आज त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. तसेच, सर्वसामान्य कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित भावनेतून काम करणाऱ्या बाबर कुटुंबियांतील सौ. शर्मिलाताई बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होत आहे. ही किमया फक्त भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे.”
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला अद्याप १२ दिवसही पूर्ण न झाल्याने, भाजपाने राजकीय संवेदनशीलता जपण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात कोणताही जल्लोष किंवा फटाके न फोडण्याचे आवाहन भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक यांना करण्यात आले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ किंवा ढोल-ताशांच्या गजरात न करता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीक असलेली ‘भारतीय संविधानाची प्रत’ देऊन करण्यात आले.
शहराच्या ‘शाश्वत विकासासाठी’ कटिबद्ध
आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या ‘‘शाश्वत विकासासाठी’’ आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकप्रतिनिधींचे सभागृह पुन्हा सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.