राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) देखील मध्यरात्री पावणे दोन वाजता अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचले.
जरांगे यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडण्याची मागणी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला इशारा देत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आठ दिवसात दुसऱ्या भेटीने राजकीय वर्तुळात मनधरणीच्या प्रयत्नांवर चर्चांना उधाण आले आहे.