Saturday, September 7, 2024

इस्लामिक कट्टरतावाद मुक्त जगाची नांदी

Share

इस्लामिक कट्टरतावाद काय आहे हे तर आपल्याला पुरेपूर माहिती आहे. केवळ १४०० वर्षांची आयु असणाऱ्या इस्लाम या पंथाची आज जगात सुमारे २५% लोकसंख्या आहे. तलवारीच्या जोरावर पहिल्या चाळीस वर्षांतच त्यांनी बहुतांश इस्लामिक जगत काबीज केले होते हा इतिहास विसरता येणे शक्य नाही. आज १९५ पैकी सुमारे ५७ देश इस्लामिक देश मानले जातात. जन्मदरानुसार जगातला सर्वात वेगाने वाढणारा धर्म अशी आज इस्लामची ओळख आहे.

जगाला कट्टरतावाद-मुक्त करण्याचे प्रयत्न
इस्लामच्या स्थापनेपासूनच इस्लामिक जिहाद, कट्टरता या गोष्टी इस्लामचा अविभाज्य घटक राहिल्या आहेत.
त्यामुळे जगामध्ये जर शांतता, मानवता प्रस्थापित करायची असेल, पर्यावरणदृष्ट्या स्वस्थ जीवन जगभरातील ७ बिलियन लोकांना आज आणि येणारी हजारो वर्षे मिळावे असे वाटत असेल तर ‘इस्लामिक कट्टरतावाद नष्ट करणे’ आवश्यक आहे. यावर जगभरातील तज्ज्ञांचे एकमत होऊ लागले आहे. अनेक राष्ट्रांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रयत्न
इस्लामिक कट्टरतावाद या विषयात स्वाभाविकपणे इस्लामच्या सुरुवातीपासून इस्लामिक असणारे आणि सध्याच्या काळात आर्थिक, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या प्रभावशाली असणारे प्रामुख्याने मध्यपूर्वेतील देश कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

मध्यपूर्वेतील या मुस्लीम देशांच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने जमिनीतील तेलावर आधारित आहेत. या धरतीच्या पोटातील तेलाच्या जोरावर तिथल्या राज्यकर्त्यांनी आजवर जगात आपली सत्ता राबवली. अमेरिका, युरोपीय देशांना आपल्या अटी मान्य करायला भाग पाडले. त्या काळातील इतर गरीब राष्ट्रांमध्ये, ज्यात भारतही येतो, तिथे आपली दहशत कायम ठेवली. इस्लामचा प्रसार, प्रचार केला. इस्लामिक विचारसरणीला मान्यता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी प्रोपगंडा तंत्राचा वापर करून इस्लाम ही शांतीप्रिय विचारसरणी आहे हे जगातील लोकांच्या मनांवर बिंबवायचा प्रयत्न केला. त्यासाठी विविध देशांचे राजकारणी, चित्रपट निर्माते, पत्रकार, सामाजिक संस्था, समाजमान्य विचारक यांचा खुबीने वापर केला. पण जगभरात होणारे बॉम्बस्फोट, गुंडबाजी, फतवे इत्यादी गोष्टी इस्लामिक जिहादाशी निगडित असतात हे शेकडो वेळा सिध्द होत राहिल्याने जगभरातून त्यांना व्यंगात्मक पद्धतीने ‘शांतिप्रिय’ म्हटले जावू लागले.

आता परिस्थिती बदलू लागली आहे. जग अशा टप्प्यावर आले आहे जिथे उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत भारत हा सौरऊर्जा क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाचा देश म्हणून गणला जाऊ लागला आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर, संशोधनावर भारत सरकार खूप भर देत आहे. ब्राझीलसारखे राष्ट्र इथेनॉल वापराच्या यशाचे एक अग्रणी उदाहरण आहे. भारतही आता २०% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापर करतो. म्हणजेच इतकी पेट्रोलची आयात आणि किंमत कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

मध्यपूर्व देशांना आता ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली आहे की फुकट मिळणाऱ्या या तेलाच्या उत्पन्नाचे जीवनमान केवळ १५-२० वर्षे आहे. त्यानंतर सगळेच जग इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होवू लागणार आहे. आणि त्यांचा एकाधिकार संपला तर त्यांच्या धार्मिक अधिष्ठानाचे महत्त्वही आपोआप संपणार आहे. जगात घडणाऱ्या बदलांशी आपल्या समाजाला जोडून नवीन जागतिक व्यवस्थेतील बदलांचे नियम जाणून घेणे, ते आत्मसात करणे आता त्यांना आवश्यक वाटू लागले आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपल्या धार्मिक, पारंपरिक चौकटीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यानुसार अनेक चांगले बदल इस्लामिक जगतात होताना दिसत आहेत.

UAE मध्ये झालेले भव्य मंदिर निर्माण ही या बदलांची ठळक नांदी म्हणता येईल. अबुधाबी, यूएई, सौदी अरेबिया सारखे देश हिंदू धर्मगुरूंना आमंत्रित करून त्यांच्या सन्मानार्थ मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसू लागले आहेत.

सौदीचे राजा MBS यांनी गेली काही वर्षे महिलांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य देण्यास सुरुवात केली आहे. महिलांना गाडी चालवण्यास परवानगी देणे, मिस वर्ल्ड स्पर्धेत सौदी अरेबियाच्या स्पर्धकांचे सहभागित्व, सौदी महिला मुत्सद्दी भारतीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांसोबत स्वतः पुढाकार घेऊन हस्तांदोलन करत असतानाचे छायाचित्र, जागतिक स्तरावर वाहवा मिळवलेले इराण मधील महिलांनी केलेले हिजाबविरोधातील तीव्र आंदोलन या आणि अशा हजारो, लाखो छोट्यामोठ्या गोष्टी, नव्या स्वतंत्र कट्टरतावादमुक्त युगाचीच नांदी नव्हे काय?

युरोपातील प्रयत्न
युरोपीय राष्ट्रे आतापर्यंत इस्लामिक कट्टरतावादापासून अलिप्त होती. पण आता आपल्या समाजाला मोठ्या प्रमाणात युरोपातील आर्थिकदृष्ट्या पुष्ट राष्ट्रांमध्ये प्रस्थापित करण्याच्या इस्लामिक राष्ट्रांच्या प्रयत्नांविरोधात तेथील सजग मंडळीही ओरडा करू लागली आहेत. पोलंड या देशाने तर मुस्लिम स्थलांतरितांना स्पष्टपणे नाकारले आहे. युरोपमधील विविध देशांतील स्थानिकांवर मुस्लिमांकडून होणारे हल्ले जग स्पष्टपणे ऐकेल, याची खात्री पाश्चात्य मीडिया करत आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रांत ex-मुस्लीम म्हणजे इस्लाम धर्म सोडणाऱ्यांची मोठी चळवळ उभी रहात आहे.

भारतातील प्रयत्न
या पार्श्वभूमीवर भारतात पोसली जाणारी कट्टरता संपून भारतीय समाजातील प्रत्येक घटकाने विकासात्मक, शांतताप्रिय मार्गाने भविष्याकडे वाटचाल करावी यासाठी भारतातही विविध स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत. तीन तलाक बंदी हा कट्टरतावादी विचारसरणीला छेद देणारा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला. मुस्लिम विद्यार्थ्यांनी सामान्य सरकारी किंवा नियमित शाळांमध्ये प्रवेश घ्यावेत यासाठी तसेच मदरसा रचनेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. CAA कायदा म्हणजे कट्टरता वादाचे परिणाम नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानात पनपणाऱ्या जिहादी गटांना बालाकोट एअर स्ट्राइक आणि विविध प्रकारे भारत सरकार योग्य उत्तर देत आहे.वायुसेनेतील अधिकारी अभिनंदन यांना परत आणणे, कुवेतमधून ८ अधिकाऱ्यांची फाशी रद्दबातल करून त्यांना सुखरूप परत आणणे, विविध राष्ट्रांना त्यांच्या धर्माचा विचार न करता लस पुरवठा करणे, भूकंपाच्या वेळी भारतविरोधी असूनही तुर्कीला मदत करणे या भारतीय मुत्सद्देगिरीच्या आतंकवाद विरोधातील यशस्वी खेळी आहेत.

भारतीय संस्कृतीच्या योग, आयुर्वेद, ध्यान, तत्वज्ञान इत्यादी मन, मेंदू, शरीराला आरोग्यवान करणाऱ्या भारतीय गोष्टी सॉफ्ट पॉवर म्हणून जगभरात व्यापक पद्धतीने प्रसारित होत आहेत. स्वामी विवेकानंदांनी दाखवलेला भौतिकतेच्या गर्तेतून सुटका करून देणारा मार्ग जगाला दिसत आहे. आजघडीला आपण समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात आहोत. म्हणजेच या विषयावर विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

भारतीय राजकीय रंगभूमीतून तुष्टीकरणाच्या राजकारणाचे उच्चाटन करणे असे उद्दिष्ट ठेवून भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष आपले राजकीय धोरण आखत आहे. याचाच परिणाम म्हणून आपण राहुल गांधींना मंदिरात जाताना, जानवे घालताना, असदुद्दीन ओवेसी याना केशरी माळा घालून हिंदू पंडितांसोबत फोटो काढून घेताना पाहतोय. भारतीय समाजाचे इस्लामोफोबिया ते राममंदिर निर्माण प्रसंगी सक्रिय सहभाग असे ठळक मानसिक स्थित्यंतर आपण अनुभवतो आहोत. स्वतःला उदारमतवादी किंवा धर्मनिरपेक्ष म्हणवणारे सामान्य लोकही आता जिहादी दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवत आहेत.

काश्मीर फाइल्स, केरळ फाइल्स, कलम 370, रझाकार यांसारखे चित्रपट प्रचंड लोकप्रिय होत आहेत. चित्रपटाच्या विशिष्ट सामाजिक, राजकीय मुद्याला धरून केलेली कथेची बांधणी त्या कथेमागे दडलेले वास्तव समजण्यास मदत करीत असेल तर लोक त्याचे खुल्या दिलाने स्वागत करतात. कारण समाजाला वास्तव दिसत असते पण ते त्याचा उच्चार करू शकत नाहीत. हलाल इकोसिस्टम कसे कार्य करते याबद्दल प्रामाणिक माहिती सामायिक करून त्याच्या विरोधात बरीच जागरूकता पसरवली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान – भारतात जन्म घेतलेले, भारतीय पालक असणारे सर्व लोक त्यांची जात, धर्म विचारात न घेता हिंदू आहेत. त्यापैकी काही लोकांनी केवळ आपली उपासनेची पद्धत बदलली आहे. परंतु हिंदू धर्म उपासनेचे अनेक मार्ग स्वीकारतो. आणि बहुदेवत्वाचा पुरस्कार करतो. त्यामुळे हिंदू समाज कायमच आपल्या धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांना आपले म्हणत आला आहे. या विधानाचा सुरुवातीला हिंदू समाजातही खूप विरोध झाला. पण आता फक्त हिंदूच नाही तर काही प्रमाणात का होईना पण मुस्लीम आणि ख्रिश्चन सुद्धा हा मुद्दा मोठ्या अभिमानाने मान्य करत आहेत. हे धडधडीत सत्य स्पष्टपणे मांडले गेल्यामुळे दोन समाजामध्ये असणारा विरोधही पुढच्या काळात मावळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या ७५ वर्षांत भारतीय सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्षात कम्युनिझम, काँग्रेस पक्ष, जिहादी इस्लामिक कट्टरतावादी गट, आणि धर्मांतरवादी चर्च इकोसिस्टम गरजेप्रमाणे हातात हात घालून काम करतात. यावेळचा काँग्रेसचा जाहीरनामा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ते कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि आर्थिक मॉडेल्सचा वापर इस्लामिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी, तुष्टीकरणाची राजनीती करत या देशातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी करत आहेत. त्याचा फायदाही त्यांना होताना दिसत आहे. आता भारतीय समाजाने या कट्टरता वाद विरोधी लढाईतील आपली आहुती योग्य जागी टाकली की नाही हे कळायला निकालांची प्रतीक्षा आहे.

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या असून आंतरराष्ट्रीय आणि ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख