महाराष्ट्र : उकाड्याने होरपळून निघालेल्या नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Monsoon) कधी धडकणार यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीये. मान्सून केरळमधून आता कर्नाटकात दाखल झाला आहे. सध्या मान्सून तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यात पोहोचला असून येत्या त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर आजपासून पुढील ३ दिवस तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मुंबईत पावसाचं आगमन वेळेवर होणार असून पावसाचे प्रमाणदेखील समाधानकारक असणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तापमानात घट झालीये. त्यामुळे आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील. दरम्यान आता कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.