Tuesday, January 28, 2025

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य

Share

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, मनसे, सर्वच राजकीय पक्षसोबत अपक्ष उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या नवनिर्माण यात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला.

  • राज ठाकरे यांच्या संवादातील महत्वपूर्ण मुद्दे

१) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे.

२) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे.

३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं.

४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की.

५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे.

६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे.

७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो.

८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात.

९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे.

१०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का?

११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे?

१२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना?
मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत.

१३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत .

१४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार…

अन्य लेख

संबंधित लेख