Thursday, November 7, 2024

श्रीराम मंदिर हेच राष्ट्रमंदिर

Share

लोक श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येतील, तेव्हा ते राष्ट्रपुरुषाच्या दर्शनासाठीदेखील येतील. श्रीरामांच्या दर्शनाने प्रत्येक हिंदूच्या मनात वाईटाविरुद्ध संघर्ष करण्याचा संकल्प, चांगल्या शक्तींच्या बाजूने उभे राहण्याचा संकल्प वृद्धिंगत होईल, दृढ होईल. त्याचबरोबर सामाजिक समरसतेचा संदेश भगवान श्रीराम यांच्या जीवनाने दिला आहे, तो संदेशसुद्धा हिंदूंच्या जीवनात दृढमूल होईल.

श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलन हे जगभरातल्या कुठल्याही श्रद्धास्थानासाठी झालेल्या दीर्घतम आंदोलनांपैकी एक आंदोलन आहे. जवळजवळ पाच शतकं चाललेल्या या आंदोलनाने हिंदू जनमानसावर प्रचंड परिणाम केला, सकारात्मक परिणाम केला आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की, हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचं हे आध्यात्मिक आंदोनल आहे. केवळ हिंदू समाजाचा मानभंग करण्याकरिता मुस्लीम विदेशी आक्रमकांनी श्रीराम मंदिराचा नाश केला, आणि हिंदूंना अपमानित करण्याकरिताच श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी बाबरी ढाचा उभा केला. तसेच हिंदू समाजाच्या निरंतर संघर्षामुळे मशिदीचं बांधकाम मुसलमान कधीही पूर्ण करू शकले नाहीत; या पाच शताब्दींच्या अत्यंत भीषण अशा संघर्षामध्ये लाखो रामभक्तांनी आपलं बलिदान दिलं आणि म्हणून हे जे एक अपमानाचं प्रतीक श्रीराम जन्मभूमीवर होतं, ते नष्ट करणं म्हणजेच स्वाभिमानाच्या प्रतीकाची पुनर्स्थापना करण्याकरिता त्या ठिकाणी पुन्हा श्रीराम मंदिर बांधणं हा हेतू घेऊनच हे सर्व आंदोलन शेकडो वर्षांपासून सुरू होतं.

Ashok Singhal

हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचं आध्यात्मिक आंदोलन
या आंदोलनामुळे हिंदू जनमानस इतक्या प्रचंड प्रमाणात आंदोलित झाले की, हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचं एक आध्यात्मिक आंदोलन म्हणूनच श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनाला सगळेजण स्मरण करतील. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे अनेक परिणाम आहेत आणि अनेक प्रकारच्या सुंदर गोष्टी या श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे समाजाच्या समोर आलेल्या आहेत. समाजामध्ये एक मूलभूत परिवर्तन घडवून आणण्यामध्ये श्रीराम जन्मभूमीच्या या आंदोलनाचं खूप मोठं योगदान आहे. एक महत्त्वाचा परिणाम असा आहे की, हिंदू समाजाला अपमानित करून या देशाची यशस्वी राजनीती आता संभव होणार नाही, हे दाखवून देण्याचं काम श्रीराम जन्मभूमी आंदोलनाने केलं. जेव्हा समाजातील अनेकांमधे हिंदू असण्याबद्दल हीनतेची भावना होती, तेव्हा ती हीनतेची भावना दूर करून ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असा स्वाभिमानाचा, एक अस्मितेचा भाव अन् त्याचं पुनर्जागरण करण्याचं कार्य श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनाने केलेलं आहे.

सामाजिक चिंतनाच्या केंद्रबिंदूमध्ये हिंदुत्वाला आणून ठेवण्याचं काम श्रीराम जन्मभूमीनं केलं. आपण पाहतो की, या देशाच्या उत्थानाकरिता ज्या प्रकारच्या चिंतनाची आवश्यकता होती ते हिंदू आधारित, हिंदूहित आधारित, हिंदू स्वाभिमानावर आधारित असणारं चिंतनच या श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे पुन्हा प्रबल झालं आहे. श्रीराम मंदिराच्या निर्माणाकरिता हे सगळं आंदोलन झालं, त्या भगवान श्रीरामांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की, भगवान श्रीराम सगळ्यांचे आहेत.

राष्ट्रासाठी आदर्श
आजही आपल्या लोकजीवनामध्ये, म्हणींमध्ये, लोककलांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमधे विविध भाषांमधे, आपल्याला भगवान श्रीरामांची सतत अनुभूती होत राहते. आपण जर भगवान श्रीरामांचं जीवन पाहिलं तर सामाजिक समरसतेचा मोठा संदेश हा भगवान श्रीरामांच्या जीवनातून आपल्याला मिळतो. त्यांना साहाय्य करणारा निषादराज तसेच त्यांना प्रत्यक्ष नदी पार करणारे केवट, त्यांना वनांमध्ये मदत करणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या सर्व जनजाती पाहिल्या तर सामाजिक समरसतेचा संदेश आपल्या जीवनातून भगवान श्रीरामांनी सातत्याने दिला आहे. आपण आदर्श रूपाने कसे जगलं पाहिजे याचा आदर्श म्हणजे भगवान श्रीरामांचे जीवन आहे आणि म्हणूनच मित्रा मित्राचं नातं, शत्रूचं नातं, राजा प्रजेचं नातं, पती-पत्नीचं नातं, भावा-भावांचं नातं, पिता पुत्राचं नातं, माता पुत्राचं नातं अशी सर्व प्रकारची नाती आदर्श रूपाने जगून दाखवण्याचं काम आणि स्वतःच्या बाबतीत अत्यंत कर्तव्यकठोर राहून सर्वांची चिंता करणारे असे हे श्रीरामांचे स्वरूप आपल्या राष्ट्राकरिता एक आदर्श म्हणून आपल्याला समोर दिसून येते.

आपल्या संविधानामध्ये सुद्धा रामायणातले प्रसंग चित्ररूपाने नमूद केले आहेत. संविधान हे अशा आदर्शांना घेऊनच बनवले गेलेलं आहे. अनेक महापुरुषांनी, अनेकांनी आपलं जीवन भगवंताच्या चरित्राच्या प्रेरणेपासून घडवले आहे. देशाकरता, धर्माकरता, समाजाकरता सर्वांच्या दृष्टीने श्रीरामांचे चरित्र हे आपल्याला आदर्शवत आहे, असे अनेक महापुरुषांच्या वक्तव्यांतून आणि त्यांच्या जीवनातून आपल्याला दिसून येतं. आज राष्ट्रीय अस्मिता म्हणूनही रामरायांच्या चरित्राकडे आपल्याला पाहता येईल.

तीर्थक्षेत्र म्हणून अयोध्येचा विकास
आज आपण रामजन्मभूमीच्या आंदोलनाकडे जर पाहिलं तर रामजन्मभूमीच्या आंदोलनामुळे आणि या मंदिर निर्माणामुळे संपूर्ण अयोध्याच विकासोन्मुख झालेली आहे. आज अयोध्येचं अर्थतंत्र आणि पर्यायाने उत्तर प्रदेशाचं अर्थतंत्र हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रभावित झालेलं आहे, असं या राममंदिराच्या निर्माणातून आपल्याला लक्षात येतं. हा केवळ राम मंदिराचा विकास होत नाही तर अयोध्या हे तीर्थ जैन, बौद्ध, शीख या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पाच तीर्थंकर यांच्या जन्माचे स्थान अयोध्या आहे. भगवान बुद्धांच्या तपश्चर्येचंही स्थान अयोध्या आहे आणि गुरुगोविंद सिंग, गुरु तेज बहादुरजी आणि गुरुनानक देवजी या तीन श्रेष्ठ शीख गुरूंचासुद्धा संबंध अयोध्येशी आलेला आहे. म्हणून रामजन्मभूमीच्या विकासासोबतच संपूर्ण अयोध्या शहर आणि त्यातील सर्व तीर्थांच्या उत्कर्षाचं, उत्थानाचं कार्य आज घडून येत आहे. शहराचा जो मास्टर प्लॅन बनलेला आहे, मंदिराचा जो मास्टर प्लॅन बनलेला आहे, त्या सगळ्या दृष्टीने एक श्रेष्ठ तीर्थक्षेत्र या स्वरूपात अयोध्या शहर विकसित होत आहे. या श्रीराम मंदिर परिसरामध्ये श्रीरामदरबाराच्या व्यतिरिक्त, श्रीरामलल्लांच्या व्यतिरिक्त, महर्षी वाल्मीकी, ब्रह्मर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, शबरीमाता, निषादराज अशी अनेक मंदिरं उभी आहेत.

श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराची निर्मिती अनेक गोष्टींची शक्यता सूचित करणारी आहे. जेव्हा जेव्हा लोक श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येतील, तेव्हा तेव्हा ते राष्ट्रपुरुषाच्या दर्शनासाठीदेखील येतील. श्रीरामांच्या दर्शनाने प्रत्येक हिंदूच्या मनात वाईटाविरुद्ध संघर्ष करण्याचा संकल्प, चांगल्या शक्तींच्या बाजूने उभे राहण्याचा संकल्प वृद्धिंगत होईल, दृढ होईल. त्याचबरोबर सामाजिक समरसतेचा संदेश भगवान श्रीराम यांच्या जीवनाने दिला आहे, तो संदेशसुद्धा हिंदूंच्या जीवनात दृढमूल होईल. जेणेकरून हिंदू समाज आतून निर्दोष होईल अन् विषमतेपासून मुक्त होईल. त्यासोबतच राममंदिर उभारणं केवळ पुरेसं नाही; तर राममंदिराच्या निर्माणातून अशा शक्ती हिंदू समाजात जागृत होणार आहेत की, हिंदूंच्या मंदिरांचा, आस्थांचा, प्रतीकांचा, चिन्हांचा नाश करण्याची शक्ती कोणामध्ये राहणार नाही, असं वातावरण राममंदिराच्या निर्माणातून तयार होईल की, रामरायांचं मंदिर भावी रामराज्याच्या संकल्पनेलासुद्धा दृढ करणारं राहील. म्हणूनच श्रीराममंदिर हीच राष्ट्रमंदिराची मुहूर्तमेढ आहे. हे हिंदूराष्ट्र अनादिकालापासून अस्तित्वात आहे. ते प्रबल आणि शक्तिमान होऊन विश्वकल्याणाकरिता विश्वगुरू म्हणून भारताची भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आपण राममंदिराकडे पाहू शकतो.

मिलिंदराव परांडे
(लेखक विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख