भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपल्याला पहायला मिळतो विविध संग्रहालयांमधून. देशातील अनेक संग्रहालयांमध्ये आपला समृद्ध वारसा आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडते. हजारो प्राचीन वस्तू, शिल्प, कागदपत्रे आणि आपल्या वारशाचे जतन या संग्रहालयांमुळे झाले आहे. आपल्या देशातील अनेक संग्रहालये अशी आहेत, की जी पाहण्यासाठी हजारो पर्यटक आवर्जून जात असतात. ही संग्रहालये इतिहास जागवतात. अभ्यासकांना मार्गदर्शन करतात. नव्या पिढीला प्रेरणाही देतात.
दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, पुण्यातील राजा केळकर संग्रहालय, कोल्हापूरमधील टाऊन हॉल संग्रहालय, म्हैसूर पॅलेस, रेल्वेची समग्र माहिती देणारे पुण्यातील जोशी म्युझियम, विश्रामबागवाडा संग्रहालय, सिम्बायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम, डेक्कन कॉलेजमधील संग्रहालय… अशी प्रसिद्ध संग्रहालयांची कितीतरी नावे सांगता येतील. पुण्यात एका नव्या विषयावरील संग्रहालयाचे उद्घाटन डिसेंबर २०२४ मध्ये झाले. हे आहे संघाच्या घोषाची (बॅंड) समग्र माहिती देणारे आगळे-वेगळे संग्रहालय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यात संघाचे संचलन हेही एक वैशिष्ट्य राहिले आहे. संघाच्या गणवेशामध्ये घोषाच्या तालावर (बँड) निघणारी संचलने किंवा घोष वादनाची प्रात्यक्षिके संघाचे दर्शन समाजाला घडवतात. अनेकदा घोष वादनाची प्रात्यक्षिकेही संघाच्या कार्यक्रमांमधून सादर केली जातात. शताब्दीपर्यंत पोहोचलेल्या संघाच्या घोषाचा इतिहासही महत्त्वाचा आहे.

संघाच्या या घोषाची समग्र माहिती देणारे एखादे संग्रहालय असले पाहिजे, या विचारातून हे संग्रहालय विकसित करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव)’ असे त्याचे स्वरूप आहे. पुण्यात असलेल्या संघाच्या ‘मोतीबाग’ कार्यालयामध्ये हे संग्रहालय विकसित करण्यात आले आहे.
घोषविषयक माहितीचा खजिनासंघाच्या घोषाचा प्रारंभ कसा झाला, अगदी सुरुवातीला घोषासाठीची वाद्ये कशी जमविली गेली, त्यासाठी स्वयंसेवकांनी किती कष्ट सोसले, पुढे
त्यांना प्रशिक्षण कसे मिळाले, त्यानंतर घोषातील वाद्यांवर वाजवल्या जाणाऱ्या रचना किंवा सुरावटी कशा तयार होत गेल्या अशी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचे काम स्वयंसेवकांनी केले आहे आणि हे काम यापुढेही सुरू राहणार आहे.
ही सारी संकलित माहिती घोष या विषयाचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी या संग्रहालयात उपलब्ध आहे. अभ्यासकांना तसेच या विषयातील तज्ज्ञांना येथे संशोधन तसेच अध्ययनही करता येणार आहे.
संग्रहालयात काय पहाल…
संघाच्या घोषातील सर्व वाद्ये या संग्रहालयात मांडण्यात आली आहेत. यातील अनेक वाद्यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. वंशी, वेणू, (Fiute), मुखसंवादीनी (Mouth Organ), मधुरिका (Pianica) स्वरद (Calrinet), तार स्वरद (Clarinet Eb), नागांग (Saxaphone), तारतर नागांग (Sopranino Saxaphone), तूर्य (Trumpet), प्रतान प्रतूर्य (Sliding Trombone), शंख (Bugle), आनक (Snare Drum), कुक्कुट (Bagpipe), शृंग (Cornet ), त्रिभुज (Triangle), पणव, झल्लरी ही वाद्ये तसेच घोष दंड (Staff) या संग्रहालयात आहेत. या वाद्यांबरोबरच अनेक पारंपरिक वाद्येही संग्रहालयात आहेत. त्यात प्रामुख्याने नगारा, हलगी, डफ, दिमडी, तुतारी, सनई इत्यादीचा समावेश आहे.
या प्रत्येक वाद्यासमोर त्या त्या वाद्याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. ही माहिती मराठी आणि हिंदीमध्ये आहे. याशिवाय प्रत्येक वाद्यासमोर असलेला QR Code scan केल्यास दोन अडीच मिनिटे एवढ्या कालावधीतील त्या त्या वाद्याची माहिती ऐकता येते. या माहितीबरोबरच त्या त्या वाद्याचे वादनही ऐकायला मिळते.

घोषाचा योग्य इतिहास समजेल
या संग्रहालयाचे उद्घाटन संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांच्या हस्ते १६ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले. ‘‘योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या घोष अभिलेखागाराचे महत्त्व खूप मोठे आहे. अभिलेखागारामुळे घोषाचा योग्य इतिहास नव्या पिढीसमोर येईल,” असा विश्वास डॉ. मोहनजी भागवत यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला होता.
‘‘संघाच्या घोष विभागाचा इतिहास नव्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात घोष विभाग कसा होता आणि तो कसा विकसित होत गेला याची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असणे आवश्यक होते. हे काम या अभिलेखागारामुळे झाले आहे,” असेही डॉ. भागवत म्हणाले होते.
हे संग्रहालय निःशुल्क असून आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ११ ते १ सायंकाळी ४ ते ७ या वेळेत खुले असते.
अधिक माहितीसाठी घोष संग्रहालय, मोतीबाग, ३०९ शनिवार पेठ, पुणे – ४११०३० येथे श्री. मोरेश्वर गद्रे – ९४२३०४२८०६ यांच्याशी संपर्क साधता येईल.
कोटप्रांगणीय संगीताची परंपरा भारतातून लुप्त झाली होती. हे प्रांगणीय संगीत भारतीय संगीताच्या दालनात पुन्हा संघामुळेच आले. प्रांगणीय किंवा मैदानी संगीताचे पुनरुज्जीवन ही संघाच्या घोषाची विशेषता आहे.
– डॉ. मोहनजी भागवत
सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून, १६ डिसेंबर २०२४)
काय आहे या संग्रहालयात -
संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती
संघाच्या घोषातील वाद्ये तसेच पारंपरिक वाद्ये
घोषासंबंधीचे ग्रंथ, पुस्तके, लेख, कागदपत्रे- जुन्या चित्रफिती (व्हिडिओ कॅसेट),
ध्वनिफिती (आॉडिओ कॅसेट)