Tuesday, March 17, 2026

ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेचा प्रसार; डॉ. पॉल दिनाकरण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा

Share

सांगली : कवलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ या ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चेन्नई येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. पॉल दिनाकरण आणि सॅम्युअल दिनाकरण यांचा समावेश असून, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

कवलापूर येथे १३ ते १५ मार्च दरम्यान ‘होप ऑफ ग्लोरी मिनिस्ट्री’च्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला परवानगी देताना पोलिसांनी काही अटी व शर्ती घातल्या होत्या. मात्र, पहिल्याच दिवशी (१३ मार्च) सभेमध्ये अंधश्रद्धा पसरेल अशी वक्तव्ये करण्यात आल्याचे पोलिसांच्या चित्रीकरणात दिसून आले.

अंधश्रद्धेचे धक्कादायक दावे

पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ शूटिंगमध्ये असे दिसून आले की, कार्यक्रमात काही व्यक्तींना व्यासपीठावर आणून चमत्कारिक दावे करण्यात आले. ‘ले हँड प्रे’ (हाथ ठेवून केलेली प्रार्थना) केल्यामुळे रक्ताचा गंभीर आजार बरा झाला, तसेच पदवी परीक्षेत ९९% गुण मिळाले, असे दावे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करण्यात आले. या कृत्यास चिथावणी दिल्याबद्दल पोलिसांनी आयोजक आणि वक्त्यांवर कारवाई केली आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

१. दिलीप सुधाकर भोरे (विश्रामबाग, सांगली)

२. रावसाहेब वसंत वाघमारे (सातारा)

३. डॉ. पॉल दिनाकरण (चेन्नई)

४. सॅम्युअल दिनाकरण (चेन्नई)

५. सुजी (मुंबई)

६. अन्य एक अनोळखी व्यक्ती

या सभेपूर्वीच सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन, त्यात पॉल दिनाकरन यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रार्थनेद्वारे आजार बरे होणे, अपंगांना चालता येणे किंवा कॅन्सरसारख्या गाठी गायब होणे अशा वैज्ञानिक आधार नसलेल्या चमत्कारांच्या दाव्यांद्वारे लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

तसेच सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये मुलगी ‘प्रार्थनेने गाठ गेली’ असा दावा करताना दिसत असून, अशा प्रकारचे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे प्रकार समाजासाठी घातक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासोबतच अशा व्हिडिओंच्या माध्यमातून हिंदू समाजाचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, पॉल दिनाकरन यांच्या ‘जीजस कॉल्स’ यूट्यूब वाहिनीवरील दिशाभूल करणारे व्हिडिओ बंद करावेत आणि संबंधित कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

अन्य लेख

संबंधित लेख