सांगली : सांगली जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १२ लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली.
सांगलीतील झुलेलाल मंदिराजवळ दोन संशयित तरुण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने परिसरात सापळा लावला. दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणांना संशयावरून थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील पिशवीत मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि बांगलादेशी ओळखपत्रे आढळून आली.
अटकेत असलेल्या आरोपींची नावे हिमेल फरमान सोनार (वय ३५) आणि पोरोश शोयदुल चोकदार (वय २७) अशी असून, ते दोघेही बांगलादेशातील रंगपूर विभागातील रहिवासी आहेत. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली की, हे दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षांपासून मिरज रेल्वे स्थानकाजवळील एका पडक्या इमारतीत बेकायदा राहत होते. त्यांनी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव आणि पलूस येथील बंद घरांचे कडीकोयंडे तोडून चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून जप्त केलेल्या ऐवजात सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, मोबाईल आणि रोख रकमेचा समावेश आहे. त्यांच्याकडे भारतात राहण्याचा कोणताही वैध परवाना किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.