वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदू धर्म, शास्त्र, मंदिरे आणि गोवंश यांच्या संरक्षणासाठी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसी येथे ‘चतुरंगिणी सेने’च्या स्थापनेची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या सेनेत देशभरातून एकूण २ लाख १८ हजार ७०० सदस्यांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ही सेना घटनात्मक मार्गाने धर्माचे कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचीन भारतीय युद्धनीतीनुसार ‘चतुरंगिणी सेना’ म्हणजे चार घटकांपासून बनलेली सेना. यात पदाती (पायदल), अश्वदल (घोडेस्वार), रथदल आणि गजदल (हत्तीदळ) यांचा समावेश असतो. रामायण आणि महाभारतातील युद्धांमध्ये या रणनीतीचा उल्लेख आढळतो. आधुनिक काळात ही संकल्पना राबवून हिंदू संस्कृतीच्या स्तंभांचे रक्षण करण्याचे कार्य ही सेना करेल.
‘रोखा, थांबवा आणि ठोका’ कार्यपद्धती
सेनेच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना शंकराचार्यांनी ‘रोखा, थांबवा आणि ठोका’ हे सूत्र सांगितले.
१. प्रथम चुकीच्या गोष्टींबाबत सूचना देऊन प्रबोधन केले जाईल.
२. सूचना देऊनही बदल न झाल्यास कायदेशीर मार्गाने अडवले (थांबवले) जाईल.
३. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास ‘ठोका’ म्हणजेच कठोर न्यायालयीन कारवाई, पोलिसांत तक्रार किंवा स्थानिक पातळीवर प्रभावी निर्णय प्रक्रिया राबवली जाईल.
१० महिन्यांत सेना उभारणार
या सेनेचे अध्यक्ष स्वतः शंकराचार्य असतील आणि त्यासाठी २७ सदस्यीय पदाधिकार्यांची समिती घोषित करण्यात आली आहे. आगामी माघ मेळ्यापर्यंत (१० महिने) ही सेना पूर्णपणे कार्यरत करण्याचे लक्ष्य आहे. ‘गोसंरक्षण’ हे या सेनेचे मुख्य ब्रीदवाक्य आणि उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्राचीन भारतीय सैनिकी संघटना आणि रणनीतीचा हा प्रगत वारसा पुन्हा एकदा धार्मिक आणि सांस्कृतिक संरक्षणासाठी सज्ज होत असल्याने भाविकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.