बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतील आपल्या ‘सहयोग’ निवासस्थानी परतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत.
दिल्ली दौरा रद्द करून शरद पवार बारामतीत
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता शरद पवार यांनी आपला नियोजित दिल्ली दौरा तातडीने रद्द केला. मुंबईहून थेट बारामतीत दाखल झाल्यानंतर त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा सुरू केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बारामतीत पवार कुटुंबाच्या सातत्याने बैठका सुरू असून, कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शरद पवार पुढाकार घेताना दिसत आहेत.
या भेटीमागे सुनेत्रा पवार यांचे सांत्वन करणे आणि त्यांना नव्या राजकीय जबाबदारीसाठी पाठबळ देणे हा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर निर्माण झालेले तांत्रिक वाद आणि भविष्यातील राजकीय दिशा यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केवळ शरद पवारच नाही, तर पवार कुटुंबातील इतर महत्त्वाचे सदस्यही सध्या बारामतीत तळ ठोकून आहेत. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण बारामतीवर शोककळा पसरली असून, या संकटकाळात संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर शरद पवारांनी घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सत्तेतील फेरबदल आणि कौटुंबिक ऐक्य या दोन्ही दृष्टीने या भेटीकडे पाहिले जात आहे.